नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेच्या भडिमाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत प्रत्युत्तर दिले. ‘‘आता जनतेला सर्व कळते. आगामी पालिका निवडणुकीत मतदारच उद्धव ठाकरे यांच्या गटाला धडा शिकवतील’’, असे शिंदे यांनी ठणकावले.

‘‘मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे कोणाची सत्ता होती, मराठी माणूस मुंबईबाहेर जात असताना तुम्ही काय करत होतात, इतकी वर्षे तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलेत, हे जनतेला सर्व माहीत आहे’’, असे एकनाथ शिंदे बुधवारी म्हणाले. १३ राज्यांतील शिवसेनेचे राज्यप्रमुख बुधवारी शिंदे गटात सहभागी झाले. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शाब्दिक हल्लाबोल केला.

   ‘‘आम्ही मिंधे नव्हे, बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे निघालो आहोत, आम्हाला तुम्ही काय आस्मान दाखवणार, आम्हीच तीन महिन्यांपूर्वी तुम्हाला आस्मान दाखवले’’, अशी शेलकी टिप्पणी शिंदे यांनी केली.

‘‘तुम्ही आमच्यावर कंत्राटी मुख्यमंत्री असल्याचा आरोप करता. पण, आम्ही राज्यातील जनतेच्या विकासाचे कंत्राट घेतले आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, सर्व समाजघटकांच्या विकासाचे, त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे कंत्राट मी घेतले आहे. मी परिवर्तनासाठी काम करत आहे. काही दिवसांपूर्वी मी हैदराबादला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीत सहभागी झालो होतो. बैठकीनंतर हजारो लोक माझ्याभोवती जमले होते. त्यांनी राज्यात झालेल्या सत्तांतराबद्दल माझे अभिनंदन केले. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केलेली पसंत नव्हती, त्यांच्या भावनेचा आदर करून आम्ही पुन्हा शिवसेना- भाजपची युती घडवून आणली व राज्याची सत्ता मिळवली’’, असे शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या गद्दार या उपरोधिक टीकेलाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे म्हणत की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करू नका, तसे होईल तेव्हा मी शिवसेना बंद करेन. मग, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कोणी केली, बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही तुम्हाला भीती वाटत होती. तुम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली, मी सत्तेसाठी काहीही केलेले नाही. तुम्ही दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नेत्याशी जुळवून घेतले, याकूब मेननच्या कबरीचे सुशोभीकरण केले जात होते, तेव्हा तुम्ही गप्प का होतात. तुम्ही दाऊद-मेननचे हस्तक होतात का, असा सवालही त्यांनी केला.

‘‘तुम्ही फक्त घेण्याचे काम केलेत. पण, तुम्ही कोणी किती खोकी घेतली याबद्दल आरोप करत असता. मी नेहमीच देण्याचे काम केले, कधी काही कोणाचे घेतलेले नाही. म्हणून माझ्याबरोबर आमदार व खासदार आहेत आणि मोदी-शहांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो आहे. कोणी कोणी काय घेतले, याचा हिशोब माझ्याकडेही आहे, त्यावर मी महाराष्ट्रात वेळ आल्यावर बोलेन’’, अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

 ‘‘शिवसेना ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते हे नोकर नाहीत. आम्ही परिवर्तन घडवले म्हणून आता तुम्हाला गटप्रमुखांची बैठक घ्यावी लागत आहे, त्यांना मान द्यावा लागत आहे. त्यांच्यासाठी चांगले दिवस आले आहेत. अडीच वर्षांत गटप्रमुखांनी आठवण आली नाही, त्यांना तुम्ही किंमत दिली नाही, ‘वर्षां’वर, ‘मातोश्री’वर प्रवेश दिला नाही. आम्ही क्रांती केली म्हणून तुम्हाला कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत’’, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

आधीच्या सरकारमुळे प्रकल्प गमावला

‘‘वेदान्त-फॉक्सकॉनचा प्रकल्प आमच्या सरकारमुळे गुजरातला गेलेला नाही. आम्ही तर दोन महिन्यांपूर्वी सत्ता हाती घेतली. दोन-अडीच वर्षे वेदान्तला सहकार्य करण्यात आले नव्हते. त्यामुळे आम्ही सत्तेवर येण्याआधी वेदान्तने गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता’’, असे नमूद करत शिंदे यांनी हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. आता अन्य प्रकल्प राज्यात आणले जातील आणि भूमिपुत्रांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.