झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेऊ शकतात, असा खळबळजनक दावा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्षाच्या आमदाराने नुकताच आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून विधीमंडळाने तो स्वीकारला आहे. तसेच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे सातवे समन्स प्राप्त झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपा खासदार दुबे यांनी हा दावा केला आहे.

हेमंत सोरेन यांच्या पत्नीची नियुक्ती मुख्यमंत्रीपदावर केली जाऊ शकते, असा दावा दुबे यांनी केला. दुबे हे झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खासदार बनले आहेत. एक्स या सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी हा दावा केला. तसेच हे वर्ष सोरेन कुटुंबियांना कष्टदायक (अवघड) आहे, असेही सुतोवाचही त्यांनी केले.

हे वाचा >> नववर्षाची पार्टी करून येताना सहा मित्रांवर काळाचा घाला; गाडीचा चुराडा, गॅस कटरने…

निशिकांत दुबे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “झारखंडच्या गांडेय विधानसभेचे आमदार सरफराज अहमद यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तो स्वीकारलाही गेला. हेमंत सोरेनही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि त्यांची पत्नी झारखंडची पुढची मुख्यमंत्री बनेल. नवीन वर्ष सोरेन कुटुंबियांना कष्टदायक.”

झारखंडच्या राज्यपालांनी या विषयात कायदेशीर सल्ला घ्यावा, असेही दुबे यांनी सुचविले आहे. आणखी एक पोस्ट टाकून त्यांनी म्हटले, “विद्यमान विधानसभेची स्थापना २७ डिसेंबर २०१९ साली झाली. तसेच ३१ डिसेंबर रोजी सरफारज अहमद यांचा राजीनामा आला आहे, याचा अर्थ निवडणुकीला एक वर्ष उरला असल्यामुळे या मतदारसंघात पुन्हा निवडणूक होऊ शकत नाही. जेएमएम हा पक्ष हेमंत सोरेन यांचा नसून त्यांचे वडील शिबू सोरेन यांचा आहे. पक्षा सीता सोरेन, बसंत सोरेन, चम्पई, मथुरा, सायमन लोबिन, नलिन जी अशा ज्येष्ठ नेत्यांनी रक्ताचे पानी करून पक्ष इथवर आणला, आज या पक्षाचे इतके वाईट दिवस यावेत? पुन्हा सांगतो गांडेय विधानसभा मतदारसंघात निवडणूक झाल्यास तिथे एनडीएचा उमेदवार विजयी होईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीचे आतापर्यंत सात समन्स

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात मागच्या काही काळात मिळालेले हे तीसरे समन्स आहे. ईडीने दिलेल्या समन्सच्या विरोधात हेमंत सोरेन उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही गेले, मात्र त्यांची याचिका फेटाळली गेली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांना जाणुनबुजून लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप सोरेन यांनी केला.