तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं भारत राष्ट्र समितीचा ( बीआरएस ) पराभव केला होता. आता काँग्रेसनं आपला मोर्चा आंध्र प्रदेशकडे वळवला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला ४ जानेवारीला काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे आंध्र प्रदेशात काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.

वायएस शर्मिला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आहे. वायएस शर्मिला यांचे वडील वायएसआर रेड्डी संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते काँग्रेसकडून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. २०१२ साली जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत युवाजना श्रमिका रायथू काँग्रेस पक्षाची ( वायएसआरसीपी ) स्थापना केली होती.

हेही वाचा : जगन मोहन रेड्डींच्या पराभवासाठी टीडीपी-जेएसपी पक्षाने कंबर कसली; आखली १०० दिवसांची खास योजना!

मात्र, भ्रष्टाचार प्रकरणात जगन मोहन रेड्डींना तुरूंगात जावं लागलं होतं. यानंतर जगन मोहन रेड्डी यांच्या आई वायएस विजयम्मा आणि बहीण वायएस शर्मिला यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाची धुरा संभाळली. तुरूंगातून बाहेर आल्यावर जगन मोहन रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत मुख्यमंत्री झाले. यानंतर वायएस शर्मिला आणि जगन मोहन रेड्डी यांच्यात मतभेद झाले. आणि शर्मिला यांनी युवाजना श्रमिका रायथू तेलंगणा पक्षाची ( वायएसआरटीपी ) स्थापना केली.

तेलंगणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्याआधी वायएस शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. मतविभाजन होऊन भारत राष्ट्र समितीला फायदा होऊ नये म्हणून शर्मिला यांना हा निर्णय घेतला होता.

हेही वाचा : आंध्र प्रदेश : जगन मोहन रेड्डी यांच्या पराभवासाठी टीडीपी-जेएसपी एकत्र, भाजपालाही युतीत सामील होण्याचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि तेलुगू देसम पक्षाचे ( टीडीपी ) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच वायएस शर्मिला यांना पक्षात घेऊन काँग्रेस आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात जगन मोहन रेड्डी विरुद्ध बहीण वायएस शर्मिला समोरा-समोर उभे ठाकू शकतात.