खते तयार करण्यासाठी आणि वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या, तसेच वाहनांसाठी सीएनजीमध्ये रूपांतर केल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत सरकारने ६२ टक्क्यांनी वाढवली आहे.

तेल व नैसर्गिक वायू महामंडळासारख्या (ओएनजीसी) कंपन्यांनी त्यांना नामांकन आधारावर देण्यात आलेल्या क्षेत्रांतून (फील्ड्स) उत्पादन केलेल्या नैसर्गिक वायूची किंमत १ ऑक्टोबरपासून दर दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटसाठी (बीटीयू) २.९० अमेरिकी डॉलर इतकी असेल, या आदेशात नमूद केले आहे.

 कठीण तेल क्षेत्रातून उत्पादन करण्यात आलेल्या नैसर्गिक वायूची किंमत दर दशलक्ष बीटीयूसाठी ६.१३ अमेरिकी डॉलर इतकी राहील, असेही आदेशात म्हटले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लि. आणि त्याची भागीदार असलेली बीपी पीएलसी कंपनी केजी- डी६ सारख्या खोल समुद्रातील पट्ट्यातून जो वायू मिळवतात, त्यासाठी देय असलेली ही कमाल किंमत आहे.

याचप्रमाणे, खतांच्या निर्मितीचाही खर्च वाढेल, परंतु सरकार खतांवर अनुदान देत असल्याने त्यांच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता नाही.

परिणाम काय?

नैसर्गिक वायूच्या किमतीतील वाढीमुळे सीएनजी, तसेच मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमधील पाइपने मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, यामुळे वीजनिर्मितीच्या खर्चातही वाढ होईल, मात्र वायूपासून तयार होणाऱ्या विजेचे प्रमाण अतिशय कमी असल्याने ग्राहकांना त्याची फारशी झळ पोहोचणार नाही.