अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीवर तब्बल अर्धा तास पॉर्न मूव्ही लागल्याचा प्रकार समोर आला आहे. थँक्सगिव्हिंग नाइटला बोस्टनमध्ये रात्री ११ वाजता अँथनी बर्डन्स यांचा शो पाहण्यासाठी लोकांनी टीव्हीवर ‘सीएनएन’ हे चॅनल लावले. त्यावेळी हा प्रकार घडला. एका प्रेक्षकाने याबाबत ट्विट केल्यानंतर हा प्रकार समोर आला. सीएनएन या वृत्तवाहिनीने मात्र, असा काही प्रकार घडल्याचे वृत्त फेटाळून लावले. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अशा प्रकारचे बोगस वृत्त पसरवले जात असल्याचे या वाहिनीने म्हटले आहे.
वृत्तवाहिनीवर अचानक पॉर्न मूव्ही लागल्यानंतर येथील प्रेक्षक हडबडले. या प्रकाराबाबत एका प्रेक्षकाने ट्विट केले. बोस्टनमध्ये कुणी सीएनएन या वृत्तवाहिनीवर पॉर्न मूव्ही पाहिली का? असे ट्विटमध्ये विचारण्यात आले होते. मात्र, सुरुवातीला ही प्रोग्रामिंगची चूक होती, असे स्पष्ट करण्यात आले. त्यावर ही चूक सुधारण्यास अर्धा तासांचा कालावधी का लागला, असा सवाल लोक विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूजर्सी येथील केबल टीव्ही वितरक असलेल्या आरसीएनच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे, असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. पण असा काही प्रकार घडल्याचे अद्याप समोर आलेले नाही, असे बोस्टनमधील आरसीएनचे महाव्यवस्थापक जेफ कार्लसन यांनी सांगितले.
सीएनएन या वृत्तवाहिनीने प्रोग्रामिंगमध्ये झालेल्या गोंधळाला आरसीएनला जबाबदार धरले आहे. या प्रकरणी आरसीएनने उत्तर द्यावे, असेही सीएनएनने म्हटले आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत सर्वप्रथम एका प्रेक्षकाने ट्विट केले. त्यावर सर्वकाही ठिक आहे. आमच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही, असे उत्तर सीएनएनने दिले. मात्र त्यानंतर याबाबतचे वृत्त व्हायरल झाले. त्यावर सीएनएनने पुन्हा तक्रारकर्त्या प्रेक्षकाला ट्विटरवर टॅग करून काही तक्रार असल्यास मेसेजमध्ये तुमचा घरचा पत्ता द्या. तेथे येऊन प्रोग्रामिंगमध्ये दुरुस्ती करता येईल, असे सांगितले. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पुण्यात एका चौकातील स्क्रीनवरही पॉर्न मूव्ही लागल्याचा प्रकार घडला होता. अशाच प्रकारची घटना गेल्या वर्षी केरळमधील बस स्थानकात घडली होती.