सीबीआयने शनिवारी महाराष्ट्रातील कोळसा खाणी खोटय़ा नोंदीच्या आधारे दिल्याच्या प्रकरणी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यांचे सहकारी व माजी मंत्री प्रेमचंद गुप्ता व  त्यांच्या पुत्रावर एफआयआर दाखल केला आहे.
राज्यसभेचे सदस्य असलेले गुप्ता व त्यांचा मुलगा गौरव यांच्याविरूद्ध केंद्रीय दक्षता आयोगाने गुन्हा दाखल करण्यास सीबीआयशी सहमती दर्शवली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाणवाटप प्रकरणी हा २४ वा एफआयआर असून यातील गुन्ह्य़ांवर सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे. गुप्ता यांच्या कंपनीने ऊर्जा प्रकल्पांवर १०० कोटी खर्च केल्याचे खोटेच सांगितले पण छाननीत त्यांनी केवळ ८० कोटी खर्च केल्याचे दिसून आले. कंपनीने कोळसा खाण मिळवण्यासाठी चुकीच्या माहितीची कागदपत्रे दिली असा आरोप त्यांच्यावर आहे.
 गुप्ता व त्यांच्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते तीर्थयात्रेला गेल्याचे सांगण्यात आले. दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानाहून त्यांचा मोबाईल नंबर देण्यास नकार देण्यात आला.
एफआयआरमध्ये आयएसटी स्टील अँड पॉवर या आयएसटी समूहाच्या कंपनीचे नाव असून ती कंपनी गुप्ता यांचा मुलगा मयूर व गौरव यांच्या मालकीची आहे. महाराष्ट्रातील दहेगाव, माकरढोकरा येथील कोळसा खाणी या कंपनीला देण्यात आल्या होत्या व या कंपनीने १२ जानेवारी २००७ रोजी कोळसा खाणीसाठी अर्ज केला होता व त्यांना कोळसा खाणी १७ जून २००९ मध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या.