बेकायदा खाणव्यवहारप्रकरणी गोव्याच्या खाण आणि भूरचना विभागाचे माजी संचालक अरविंद लोलयेकर यांना गुन्हा अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली.
लोलयेकर यांना दोना पावला येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात सकाळी जबानीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राज्यातील खाण गैरव्यवहारांसदर्भात १० प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या बेकायदा व्यवहारांमध्ये लोलयेकर यांचा सहभाग असल्याचे सकृत्दर्शी उघड झाले असल्याची माहिती देत गुन्हे अन्वेषण विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने लोलयेकर यांच्या अटकेस दुजोरा दिला.
राज्यातील खाणींमध्ये बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचे उघडकीस आले तेव्हा लोलयेकर हे खाण आणि भूरचना विभागाचे प्रमुख होते. मार्च २०१२ मध्ये मनोहर पर्रिकर यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच लोलयेकर यांना निलंबित करण्यात आले होते. गोव्यातील बेकायदा खाण व्यवहारांमुळे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा निष्कर्ष न्या. एम.बी.शाह आयोगाने काढला आहे. या प्रकरणी शाह आयोगानेही लोलयेकर यांच्यावर ठपका ठेवला आहे.