कोळसा खाणीवाटप घोटाळाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयास नव्याने स्थितिदर्शक सीलबंद अहवाल सादर केला. या घोटाळ्यासंबंधी सध्या सुरू असलेले तपासकाम, विविध उद्योगांचा त्यामध्ये असलेला सहभाग, अन्य बडे उद्योजक तसेच नोकरशहांचा या घोटाळ्याशी काय संबंध आहे, यासंबंधीची सर्व माहिती सदर अहवालाद्वारे न्यायालयास देण्यात आली.
उद्योगपती कुमारमंगलम् बिर्ला, त्यांच्या आधिपत्याखालील हिंडाल्को कंपनी तसेच कोळसा विभागाचे माजी सचिव पी. सी. पारख यांच्याविरोधात सादर करण्यात आलेल्या प्रथमदर्शी आरोपपत्रासंबंधीही या अहवालामध्ये माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, हिंडाल्को कंपनीस वाटप करण्यात आलेल्या कोळसा खाणीप्रकरणी असलेले सर्व दस्तावेज आपल्याला देण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र सीबीआयने मंगळवारी पंतप्रधानांच्या कार्यालयास पाठविले.
या प्रकरणी सीबीआयने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.   यासंदर्भात आपल्याला काहीही दडवायचे नाही आणि सीबीआयला हवे असलेले हजारो दस्तावेज त्यांना याआधीही देण्यात आले आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी स्पष्ट
केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयस्वाल यांची पारख यांच्यावर टीका
कोळसा घोटाळाप्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप करणारे माजी सचिव पी.सी.पारख हे दिवास्वप्ने पाहणारे शेखचिल्ली आहेत, अशी टीका कोळसा खात्याचे मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी मंगळवारी येथे केली. कोळसा खाणवाटपप्रकरणी झालेल्या घोटाळ्यास पंतप्रधान मनमोहन सिंग हेही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप पारख यांनी केला होता.
या प्रकरणी मनमोहन सिंग यांनी गुणवत्तेच्या आधारेच संबंधित निर्णय घेतले होते, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाने दिलेले स्पष्टीकरण योग्य असल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले. ‘शेखचिल्लीयों के द्वारा दिये गये किसी बयान पर कोई कॉमेण्ट नही करना चाहिए’ या शब्दांत जयस्वाल यांनी पारख यांची खिल्ली उडविली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal scam cbi submits status report
First published on: 23-10-2013 at 03:08 IST