कोळसा खाणींच्या वाटपासंदर्भातील सर्व अंतिम निर्णय तत्कालीन कोळसा मंत्री या नात्याने मनमोहन सिंग यांनीच घेतल्याची माहिती माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी दिली. कोळसा घोटाळाप्रकरणी आरोपी असलेल्या राव यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात दिलेल्या साक्षीदरम्यान मनमोहन सिंग यांच्यावर थेटपणे आरोप केल्याने आता सिंग यांच्यासमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. यावेळी राव यांच्या वकीलांनी न्यायमूर्ती भरत पराशर यांच्यासमोर जामिनासाठी अर्ज करताना आपल्या अशिलाचा याप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. या खाणींच्या वाटपासंदर्भातील अंतिम निर्णय तत्कालीन कोळसा मंत्र्यांकडूनच घेतले गेले होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे त्यावेळी कोळसा मंत्रालयाची सूत्रे होती. त्यामुळे झारखंड येथील कोळसा खाणीचे जिंदाल समुहाला वाटप करण्याच्या निर्णयाशी राव यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले. कोळसा खात्याचे राज्यमंत्री म्हणून आलेल्या सूचना पुढे पाठविणे एवढेच माझे काम होते. त्यानंतर अंतिम निर्णय हा मनमोहन सिंग यांच्याकडूनच घेतला जात असल्याचेही राव यांनी सांगितले.     
तर कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच.सी.गुप्ता यांनीदेखील आपण फक्त छाननी समितीचे अध्यक्ष असल्याचे सांगत या घोटाळ्यात आपला सहभाग नसल्याचे सांगितले. माझ्यापर्यंत आलेल्या शिफारशी कोळसा मंत्रालयापर्यंत पाठवणे एवढेच माझे काम होते. खाणवाटपासंदर्भातील निर्णयांमध्ये छाननी समितीचा सहभाग मर्यादित असल्याचेही त्यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान न्यायालयाकडून दोघांनाही एक लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. काही दिवसांपूर्वीच विशेष न्यायालयाकडून मनमोहन सिंग यांना न्यायालयात हजर राहण्यासाठीचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून या समन्सला स्थगिती देण्यात आली होती.