बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांची स्तुती केल्याने सात वर्षांपूर्वी अडचणीत आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमवारी ‘त्या’ आठवणींना उजळा दिला. रामकृष्ण मिशनचे तत्कालीन प्रमुख दिवंगत स्वामी रंगनाथनानंद यांनी आपल्याला जीना यांचे एक जुने भाषण दाखवून जीना यांच्या निधर्मीपणाचा दाखला दिला होता, असे अडवाणी यांनी सांगितले. माजी केंद्रीय मंत्री राजागोपाल यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
२००५मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना अडवाणी यांनी, जीना निधर्मी नेते होते, त्यांच्याविषयी आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत, अशी विधाने केल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. फाळणीची मागणी करणाऱ्या जीना यांच्याबाबतच्या या विधानांची गंभीर दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अडवाणी यांची पक्षाध्यक्षपदावरून उचलबांगडी केली होती.
अडवाणी म्हणाले, फाळणीपूर्वी कराचीत विद्यार्थीदशेत मी प्रथम स्वामी रंगनाथनानंद यांना भेटलो होतो. कालांतराने ते रामकृष्ण मिशनचे प्रमुख झाले. कोलकात्यात एका भेटीत जीना यांच्या एका भाषणाकडे त्यांनी माझे लक्ष वेधले. धार्मिक भेदभावापासून दूर राहाण्याचे आवाहन जीना यांनी पाकिस्तानच्या संसदेत केले होते. त्या भाषणाचाच संदर्भ पाकिस्तानच्या दौऱ्यात मी दिला होता.