निलंबित खासदारांच्या मुद्द्यावर संघर्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही विरोधकांचा गदारोळ थांबलेला नाही. राज्यसभेत मंगळवारीही काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आदी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निलंबित खासदारांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र विरोधकांचे म्हणणे न ऐकता लगेचच वरिष्ठ सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतरही राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाली.

राज्यसभेतील १२ खासदारांचे निलंबन कायम असून त्यांचे संसदेच्या आवारातील आंदोलनही सुरू आहे. निलंबित खासदारांनी माफी मागितल्याशिवाय त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार नाही, असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी पुन्हा स्पष्ट केले. राज्यसभेत होत असलेल्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार आहे. खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून सभापती व्यंकय्या नायडू तसेच, सभागृह नेता पीयूष गोयल यांची वारंवार भेट घेतली. निलंबन मागे घेण्याची त्यांना विनंती केली. पण त्यांनी विरोधकांच्या म्हणण्याला काहीही किंमत दिलेली नाही. खासदारांच्या गोंधळामुळे सभागृह तहकूब करावे लागले असते तर पावसाळी अधिवेशनामध्येच खासदारांना निलंबित करायला हवे होते. गेल्या अधिवेशनातील कृत्याची हिवाळी अधिवेशनात शिक्षा दिली जात असून ती लोकशाहीविरोधी असल्याची टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

आठवडाभरानंतर दिल्लीत दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदेच्या आवारात निलंबित खासदारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तृणमूल काँग्रेसचे महासचिव व खासदार अभिजीत बॅनर्जी यांनी तृणमूलच्या दोन्ही सदनांतील खासदारांशी चर्चा केली. जनतेच्या कल्याणासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार यापुढेही काम करत राहतील आणि भाजपची लोकविरोधी धोरणे चव्हाट्यावर आणली जातील, असे ट्वीट पक्षाच्या वतीने करण्यात आले.

भरपाईच्या मागणीसाठी सभात्याग

लोकसभेत राहुल गांधी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली असून शून्य प्रहरातही हा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला. गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या संदर्भात सविस्तर भूमिका मांडली होती. मृत शेतकऱ्यांबद्दल माहिती नसल्याने भरपाई देण्याचा प्रश्नच नाही, असे केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले होते. मात्र काँग्रेसकडे पंजाब, हरियाणातील मृत शेतकऱ्यांची यादी आहे. पंजाब सरकारने सुमारे १५० कुटुंबीयांतील सदस्यांना नोकरी दिली आहे. ४०० कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाईही दिली आहे. काँग्रेस केंद्र सरकारला ही यादी देण्यास तयार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. भरपाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने संसदेत स्पष्टीकरण देण्याची मागणी करत लोकसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुकच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेत राष्ट्रीय तेलंगण समितीच्या (टीआरएस) सदस्यांनी केंद्राकडून तांदूळ खरेदी होत नसल्याचा मुद्दा मांडत सभात्याग केला. संसदेच्या आवारात निषेधाचे फलक घेऊन निदर्शने केली. संपूर्ण हिवाळी अधिवेशनात कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ‘टीआरएस’ने घेतला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict over the issue of suspended mps winter session of parliament akp
First published on: 08-12-2021 at 00:15 IST