गुजरात दौ-यावर असणारे ‘आम आदमी पक्षा’चे नेते अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारल्याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून कडाडून टीका करण्यात आली. आपल्याकडे आलेल्या अतिथींचे स्वागत करण्याची प्रथा असते, नरेंद्र मोदी यांनी केजरीवालांना भेट नाकारून या प्रथेचा अपमान केला असल्याची टीका पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते शक्तिसिंह गोहील यांनी केली आहे. दुस-या राज्यातील एखादा नेता आपल्या राज्याच्या दौ-यावर आल्यास त्याची भेट घेण्याचे किमान सौजन्य नरेंद्र मोदींनी दाखवणे आवश्यक असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. तसेच मोदींच्या जागी राहुल गांधी असते तर त्यांनी केजरीवाल यांची भेट टाळली नसती असे मोदींचे कडवे विरोधक असणा-या शक्तीसिंह गोहील यांनी सांगितले.