काँग्रेसने एक व्हिडीओ शेअर करत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. हा कथित व्हिडीओ कर्नाटकमधील हेलिपॅडचा आहे. या व्हिडीओत एक काळा बॉक्स चारचाकीत ठेवताना दिसत आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॅण्डिंग करताच हा बॉक्स हेलिकॉप्टरमधून बाहेर काढण्यात आला आणि चारचाकीत ठेवण्यात आला. यूथ काँग्रेस मीडिया इन चार्ज श्रीवत्स यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांचा दावा आहे की, चित्रदुर्गा येथे नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरचं लँण्डिंग झाल्यानंतर हा व्हिडीओ काढण्यात आला.

द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुडू राव यांनीदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘चित्रदुर्गा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक रहस्यमयी बॉक्स उतरवण्यात आला आणि एका खासगी इनोव्हा गाडीत ठेवण्यात आला. ती कार लगेच तिथून निघून गेली. या बॉक्समध्ये काय होतं आणि ही गाडी कोणाची होती याचा तपास निवडणूक आयोगाने केला पाहिजे’.

श्रीवत्स यांनी हा बॉक्स सेक्युरिकी प्रोटोकॉलचा भाग का नव्हता ? इनोव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ताफ्याचा भाग का नव्हती ? ही कार कोणाची होती ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

पण व्हिडीओत कुठेही हा बॉक्स पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरवला जात असल्याचं दिसत नाही आहे. व्हिडीओत कोपऱ्यात फक्त हेलिकॉप्टरचे ब्लेड दिसत आहे. वृत्तपत्रानुसार, निवडणूक आयोगाने आपल्याकडे यासंबंधी माहिती आल्याचं सांगितलं आहे. आम्ही तात्काळ कर्नाटकमधील मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर हा मुद्दा उपस्थित केला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने चौकशी करण्याचा निर्णय़ निवडणूक आयोगालाच घ्यायचा असल्याचं सांगितलं.