scorecardresearch

सुरक्षेच्या पत्रावर शहांनी उत्तर न दिल्याने काँग्रेस संतप्त

‘भारत जोडो’ यात्रेतील राहुल गांधींच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल काँग्रेसने केलेल्या तक्रारीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

सुरक्षेच्या पत्रावर शहांनी उत्तर न दिल्याने काँग्रेस संतप्त
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ यात्रेतील राहुल गांधींच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाबद्दल काँग्रेसने केलेल्या तक्रारीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. काँग्रेसच्या पत्राकडे अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष करत, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्युत्तर दिले गेले. शहांच्या या भूमिकेवर काँग्रेसचे नेते सोमवारी संतप्त झाले.

‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा, मंगळवारी ३ जानेवारीला दिल्लीतून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने पक्षाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी, शहांवर टीका केली.‘दिल्लीमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेसंदर्भात निष्काळजीपणा झाल्याचे सगळय़ांनी पाहिले आहे. त्याबद्दल तक्रार करणारे पत्र ऐऱ्यागैऱ्याने लिहिलेले नाही. संसद सदस्याने लिहिले असून त्याची दखल केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: घ्यायला हवी होती. या पत्राला केंद्रीय मंत्री म्हणून अमित शहांनी उत्तर देणे आवश्यक होते. पण, त्यांनी ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यावर ही जबाबदारी टाकली’, अशी नाराजी वेणुगोपाल यांनी व्यक्त केली.

‘भारत जोडो’ यात्रा पुढील टप्प्यामध्ये पंजाब व जम्मू-काश्मीर या दोन्ही संवेदनशील राज्यांमध्ये जात असल्याने राहुल गांधींच्या सुरक्षेतील त्रुटी दाखवल्या आहेत. केवळ सुरक्षेच्या मुद्दय़ावरून यात्रेमध्ये कोणताही बदल होणार नाही. सुरक्षेसंदर्भातील कुठल्याही शक्याशक्यतांना राहुल गांधी घाबरत नाहीत. यात्रेमध्ये मोठय़ा संख्येने लोक सहभागी होत असून आत्तापर्यंत कोणताही अनुचित प्रकार झालेला नाही, पुढेही होणार नाही, अशी ग्वाही वेणुगोपाल यांनी दिली.

यात्रा २० जानेवारीला जम्मूत
काँग्रेसची पदयात्रा २० जानेवारी रोजी जम्मूमध्ये प्रवेश करेल व ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये राहुल गांधी तिरंगा फडकवतील. त्यापूर्वी ही यात्रा उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब राज्यांतून जाईल. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी यात्रेमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. मात्र, काँग्रेसचे निमंत्रण मिळाले असून त्याबद्दल दोन्ही नेत्यांनी आभार मानले आहेत. काँग्रेसने निमंत्रण पाठवले नसल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 01:53 IST

संबंधित बातम्या