पश्चिम बंगालमध्ये येत्या २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेससोबतच भाजपा आणि काँग्रेसने देखील या राज्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपाने गुरुवारी ११ मार्च रोजी आपल्या स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केल्याच्या २४ तासांच्या आत काँग्रेसने देखील आपल्या ३० स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पक्षातल्या अनेक दिग्गज नेतेमंडळींचा समावेश आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या दिग्गजांसमोर काँग्रेसनं खणखणीत आव्हान उभं करण्याचं नियोजन केल्याचं स्पष्ट होत आहे.

दिग्गजांची टक्कर!

भाजपाने एकच दिवस आधी आपली स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, नुकतेच भाजपवासी झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती, यश दासगुप्ता, श्रबंती चटर्जी, पायल सरकार, हिरेन चटर्जी, केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, जुअल ओराम, नितीन गडकरी, स्मृती इराणी अशा एकूण ४० दिग्गजांचा समावेश आहे.

भाजपाच्या या प्रचारकांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून खुद्द सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत, सचिन पायलट, नवज्येत सिंग सिद्धू, कमलनाथ, भूपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंग अशी मोठमोठी नावं देखील आहेत. विशेष म्हणजे या कॅम्पेनर्समध्ये महाराष्ट्रातील एकाही नेत्याचा समावेश नसल्याचं दिसून येत आहे.

 

ममता बॅनर्जी कशा झाल्या जखमी? नंदीग्राममध्ये नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यासाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर शेवटच्या आठव्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी इतर ४ राज्यांसोबतच पश्चिम बंगालमधील मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.