पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेसने देशाच्या सुरक्षेसंदर्भात पाच महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.

– केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि एनएसए अजित डोवाल यांच्या अपयशाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी का स्वीकारत नाहीत ?

– सीआरपीएफची हवाई मार्गाने तैनातीची मागणी का नाही मान्य केली ?

– हायवेवर आरडीक्सने भरलेली गाडी कशी पोहोचली ? ५६ महिन्यात ४८८ जवान कसे शहीद झाले ?

– दहशतवाद्यांना इतक्या मोठया प्रमाणात आरडीएक्स आणि रॉकेट लाँचर्स कसे मिळाले ?

– पुलवामा हल्ल्याच्या ४८ तास आधी जैश-ए-मोहम्मदने धमकीचा एक व्हिडिओ जारी केला होता. आठ फेब्रुवारीला गुप्तचर यंत्रणांनी एक रिपोर्टही दिला होता. त्या सर्व इशाऱ्यांकडे का दुर्लक्ष केले ?

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. पुलवामा हल्ल्याच्या आठवडयाभरानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. त्याचवेळी पंतप्रधान नरेद्र मोदी उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळपर्यंत एका फिल्मसाठी व्हिडिओ शूटिंग करण्यामध्ये व्यस्त होते. जगात तुम्ही असा पंतप्रधान कुठे पाहिला आहेत का? माझ्याकडे खरोखर बोलण्यासाठी शब्द नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला आहे.