महेश सरलष्कर, अलूर, आंध्र प्रदेश

एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या आंध्र प्रदेशमध्ये या पक्षाचे आता फारसे अस्तित्व राहिलेले नाही, तरीही करनूर जिल्ह्यातील अलूर गावात भारत जोडो यात्रेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त होता, असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव रक्षा रमय्या यांनी सांगितले.

एक हजार किलोमीटरचा टप्पा पार करून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने सोमवारी आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश केला. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस खेळकरी झाल्याचा व सत्ता नसल्याचा किंचित का होईना परिणाम यात्रेवर पडलेला आहे. कर्नाटकमध्ये मिळालेला प्रचंड प्रतिसाद आंध्र प्रदेशमध्ये मिळणार नाही हे माहिती असल्याने लोकांची तुलनेत अधिक गर्दी काँग्रेसला सुखावणारी होती. करनूल जिल्ह्यातील काही गावांतून पुढील तीन दिवस ही यात्रा मार्गक्रमण करेल. मग ती पुन्हा कर्नाटक आणि दिवाळीनंतर तेलंगणामध्ये जाईल. कर्नाटकमध्ये २० दिवस होती. तेलंगणामध्ये ती १४-१५ दिवस असेल. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आंध्रमध्ये ना निवडणुका होणार आहेत ना काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे भारत जोडो यात्रा फक्त चार दिवस असेल.

हेही वाचा >>> तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”

अलूर आणि आसपासचा परिसर कर्नाटकच्या सीमेवर ती असून तिथल्या यात्रेवर कर्नाटक काँग्रेसचा अधिक प्रभाव असल्याचे काहींचे म्हणणे आहे. रमैया यांच्या म्हणण्यानुसार कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला राजकीय लाभ होऊ शकतो, तेलंगणामध्येही तो होण्याची अपेक्षा आहे. आंध्रच्या शेजारील या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले, आंध्रमध्ये ही काँग्रेस मजबूत होण्यास मदत होईल!

आंध्र प्रदेशमध्ये यात्रा ४ दिवसच का, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी, भारत जोडो यात्रेत आंध्रप्रदेशला विशेष महत्त्व आहे असे सांगितले. इतकेच नव्हे तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासनही देऊन टाकले.

हेही वाचा >>> Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा

जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस हीच राष्ट्रीय काँग्रेस आहे, असे ग्रामीण जनतेला अजूनही वाटते, असे आंध्र प्रदेश मधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे. भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी लोकांच्या डोळय़ासमोर सातत्याने राहतील. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे वारसदार म्हणून राहुल गांधींकडे लोक पाहतील. राहुल गांधींची काँग्रेस ही खरी काँग्रेस असून जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष वेगळा असल्याचे आता ठसवता येऊ शकेल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या वेगवेगळय़ा राज्यांमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, आंध्र प्रदेशमध्ये स्वत:ची ओळख पुन्हा निर्माण करणे हा वेगळाच प्रश्न काँग्रेसपुढे आहे. सत्तेवर येण्याआधी जगन मोहन रेड्डी यांनी दीड वर्षे आंध्रप्रदेश मध्ये पदयात्रा काढली होती, आंध्र प्रदेशच्या मतदारांनी जगन मोहन रेड्डी यांना कौल दिला होता. तसाच कौल राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे मिळेल अशी काँग्रेसला आशा आहे.

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे, त्याच दिवशी राहुल गांधी दोन्ही या गावात पत्रकार परिषद घेणार आहेत. ही परिषद दुपारी एक वाजता असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल संध्याकाळी पाच वाजता जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या कालावधीत संभाव्य संघटनात्मक बदलावर राहुल गांधी टिपणी करतात का, याकडे लक्ष लागले आहे. जयराम रमेश यांनी मात्र तशी कोणतीही अपेक्षा करू नका, असे मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला तरीही भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्ष सक्षम होईल आणि गांधी पंतप्रधान होतील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटते. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस सक्षम नाही, इथे काँग्रेसकडे सत्ताही नाही, तरीही आम्ही काँग्रेसचे काम करत आहेत. आणखी पाच वर्षे सुद्धा आम्हाला सत्ता मिळाली नाही तरी आम्ही काम करत राहू. आम्ही जर काँग्रेससाठी काम करत असू तर, राहुल गांधी पंतप्रधान का होणार नाहीत. त्यांनी पंतप्रधान झाले पाहिजे, अशी भावना काँग्रेसचे महासचिव रुद्र राजू यांनी बोलून दाखवली.