अहमदाबाद : येथील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकामध्ये अधिवेशन आयोजित करून काँग्रेसने गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले. मंगळवारी झालेल्या विस्तारित कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये सरदार पटेलांवर विशेष ठराव मांडून काँग्रेसने या दिग्गज नेत्याचा वारसा भाजपकडून पुन्हा काबीज करण्याचा खटाटोप सुरू असल्याचेही स्पष्ट झाले.

बैठकीमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरदार पटेलांचा संघाच्या विचारांना विरोध असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. ‘पटेलांचे विचार संघाच्या विरोधात होते. पटेलांनी तर संघावर बंदी घातली होती, पण आता हास्यास्पद बाब अशी की, संघ विचारांचे लोक सरदार पटेलांच्या वैचारिक वारशावर दावा करत आहेत. ठरावामध्ये भाजप व मोदी सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका करण्यात आली आहे.

पटेलांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या बारडोली आंदोलनाचा उल्लेख करत लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांची हत्या, वादग्रस्त कृषी कायदे आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. धार्मिक द्वेष, हिंसाचार, संविधान अशा अनेक मुद्द्यांवरून भाजप व संघाला लक्ष्य करताना पटेलांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व देश उभारणीतील योगदानाचा आधार घेण्यात आला आहे. संघ स्वातंत्र्यलढ्यात नव्हताच हा मुद्दाही मांडलेला आहे. नथुराम गोडसे आणि गांधी हत्येचा ठरावामध्ये जाणीवपूर्वक उल्लेख करताना पटेलांनी ‘हिंसा व धार्मिक द्वेष देशाच्या हिताचे नसल्याचे म्हटले होते’, असे ठरावात नमूद केले आहे. पं. नेहरूंनी पटेलांवर अन्याय केल्याचा आरोप भाजप सातत्याने करतो. त्यालाही ठरावातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

अहमदाबादमधील अधिवेशनाला काँग्रेसने ‘न्यायपथ’ म्हटले असून हाच मार्ग सरदार पटेलांनी दाखवला आहे. याच मार्गाने संविधान व लोकशाहीचे रक्षण केले जाऊ शकते आणि त्याच मार्गावरून चालण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा दावाही ठरावात केला आहे. हा ठराव बुधवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीमध्ये संमत केला जाईल. गुजरातमध्ये काँग्रेसमध्ये अधिवेशन होणे हाच मोठा संदेश आहे, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करत पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी भाजप व मोदींकडे अप्रत्यक्षपणे अंगुलिनिर्देश केला.

फक्त पटेलच! 

१४० वर्षांमध्ये गुजरातमध्ये सहा वेळा तर अहमदाबादमध्ये तीन वेळा काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. गुजरातमध्ये ६४ वर्षांनी काँग्रेसचे अधिवेशन भरले असून त्याचा पहिला दिवस तरी सरदार पटेलमय झालेला होता. सरदार पटेल स्मारकाच्या बाहेर लावलेल्या मोठ्या फलकांमध्ये ठळकपणे सरदार पटेल पाहायला मिळत होते. पटेलांचे सहकारी राहिलेल्या इतर दिग्गज नेत्यांची छायाचित्रे लावणे जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे दिसले. उदयपूरच्या अधिवेशनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. आंबेडकर यांच्यापासून अनेक काँग्रेस नेत्यांची छायाचित्रे होती. इथे मात्र, फक्त पटेलच पाहायला मिळाले!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरदार पटेल आमच्या हृदयात आहेत. आम्ही त्यांचा वारसा पुढे नेऊ. सरदार पटेल काँग्रेसचे अध्यक्ष होते. पटेलांच्या नेतृत्वाखाली कराची काँग्रेसमध्ये झालेला प्रस्ताव हाच संविधानाचा आत्मा आहे. – मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष