नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या चर्चेवर काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने चीनसमोर भित्रेपणाने गुडघे टेकल्याचे व आत्सममर्पण केल्याचा आरोप काँग्रेसने केला. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या संगनमतावर पंतप्रधान मोदींचे मौन राष्ट्रविरोधी असल्याची टीकाही काँग्रेसने केली.
भारताने चीनवर दहशतवादाच्या मुद्द्यावर ‘दुहेरी भूमिका’ आणि ‘दुतोंडी भाषा’ अवलंबल्याचा आरोप बरेच वेळा केला असताना आता आता पंतप्रधान मोदींनी भारत आणि चीन दोघेही दहशतवादाचे बळी असल्याचे जिनपिंग यांना सांगितले. हे सांगणे म्हणजे तथाकथित हत्तीचे चीनसमोर नतमस्तक होणे नाही तर काय आहे, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. आतापर्यंत डावे पक्ष आणि चीन यांच्या कथित संबंधांवरून डाव्या पक्षांवर टीका करणाऱ्या भाजपला मोदी यांच्या चीन भेटीबद्दल काय म्हणायचे आहे, असा प्रश्न भाकपचे ज्येष्ठ नेते बिनॉय विश्वोम यांनी केला.
छप्पन इंच छातीच्या स्वयंघोषित नेत्याचा बुरखा फाडला गेला आहे. १९ जून २०२० रोजी चीनला निर्दोषत्व देऊन त्यांनी राष्ट्रीय हिताचा विश्वासघात केला. आता, ३१ ऑगस्ट २०२५ हा दिवस तियानजिनमधील त्यांच्या भ्याड अहंकारासाठी बदनामीचा दिवस म्हणूनदेखील लक्षात ठेवला जाईल. – जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस</p>
भाजपने संसदेत माझ्यावर आणि इतर डाव्या खासदारांवर हल्ला केला होता तो काळ तुम्हाला आठवत असेल अशी आशा आहे. आमचा एकमेव गुन्हा म्हणजे आम्ही भारत-चीन संबंधांमध्ये ‘सकारात्मक प्रगती’चा पुरस्कार केला. तुमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला चीन आणि रशियाचे एजंटदेखील म्हटले! तुम्ही आमची भारताप्रति असलेली निष्ठा विसरलात. तुम्ही असे गृहीत धरत होता की डोनाल्ड ट्रम्प आम्हाला वाचवतील. – बिनॉय विश्वोम, वरिष्ठ नेते, भाकप