हैदराबाद : काँग्रेसने आधी त्यांची सत्ता असलेल्या राज्यांत शेतीकर्ज माफ करावे, असा टोला तेलंगणचे नगरविकासमंत्री के. टी. रामाराव यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. राहुल गांधी यांनी वारंगळमध्ये अशी घोषणा केली होती की, तेलंगणमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाल्यास तेथील पिकांना किमान हमीभावासह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील.  

  राहुल गांधी यांना उद्देशून रामाराव शनिवारी म्हणाले की, काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत आधी कृषीकर्जमाफी, रयतू बंधू यांसारख्या योजना त्यांनी राबवल्या पाहिजेत. ते हे करू शकतात, हे त्यांनी आधी देशाला दाखवून द्यावे. राहुल  हे काय म्हणून तेलंगणात आले, असा प्रश्न रामाराव यांनी विचारला. त्यांची आई ही पक्षप्रमुख आहे आणि ते प्रतिरूप आहेत, त्यांचा पक्ष कालबाह्य ठरला आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस पक्ष शेतकरीधार्जिणा आहे, तर मग त्यांचा पंजाबमध्ये पराभव का झाला, असा सवालही त्यांनी केला.

तेलंगणच्या निर्मितीमुळे काँग्रेसची हानी होईल, हे माहीत असतानाही काँग्रेसने वेगळय़ा तेलंगण राज्याची निर्मीती केली, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर रामाराव म्हणाले की, वेगळे तेलंगण आम्हाला कुणी दिले नाही, तर आम्ही लढून मिळविले आहे.