नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश व गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूक तसेच, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महत्त्वाची धोरणात्मक बैठक रविवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘१०- जनपथ’ या निवासस्थानी झाली. या बैठकीत ‘रणनीती’कार प्रशांत किशोर यांनी निवडणुकांचा सविस्तर आराखडा मांडला असून नजीकच्या भविष्यात किशोर काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेच्या ३७० जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित करण्याचा आराखडा प्रशांत किशोर यांनी बैठकीत सादर केला. उत्तर प्रदेश प्रदेश, बिहार, ओडिशा आदी राज्यांमध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मात्र काँग्रेसने अन्य पक्षांशी आघाडी करून भाजपविरोधात संघर्ष करण्याचा सल्लाही किशोर यांनी दिला आहे. या बैठकीला सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी वेणुगोपाल, प्रियंका गांधी-वाड्रा, अंबिका सोनी, दिग्विजय सिंह, अजय माखन आदी नेते उपस्थित होते. प्रशांत किशोर यांनी विधानसभा तसेच, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर सादरीकरण केले असून त्यावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या गटाकडून सखोल विचार केला जाईल व आठवडाभरात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना दिली.

काँग्रेसने देशव्यापी सदस्यनोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून राजस्थानमध्ये याच (एप्रिल) महिन्यात पक्षाचे चिंतन शिबीर होणार आहे. त्यापूर्वी कार्यकारिणी समितीची बैठक  होईल. या दोन्हीची जबाबदारी अंबिका सोनी व मुकुल वासनिक यांच्याकडे सोपवण्यात आली असून दोघेही कार्यसमितीच्या बैठकीचा अजेंडा निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधत आहेत. चिंतन शिबिरानंतर पक्षांतर्गत निवडणुकाही होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून भाजपप्रमाणे काँग्रेससाठीही ती प्रतिष्ठेची ठरणार आहे. गुजरात काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाला असून लग्नानंतर नसबंदी केल्यासारखी अवस्था झाली असल्याची भावना प्रदेश कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. पण, लेवा पाटिदार समाजातील प्रभावी नेते नरेश पटेल यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांना गुजरातमध्ये पक्षाचा ‘प्रमुख चेहरा’ घोषित करण्याची सूचना किशोर यांनी केली असल्याचे सांगितले जाते.

प्रशांत किशोर यांचा पक्षप्रवेश?

काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांचे संकेत मिळत असतानाच प्रशांत किशोर हेही पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडे धोरणात्मक आखणीची प्रमुख जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. किशोर यांचा संभाव्य काँग्रेसप्रवेश व पक्षातील भूमिकेबाबतही आठवडाभरात पक्षाकडून सविस्तर माहिती दिली जाईल, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाशी पक्ष संघटनेतील बदल, आगामी धोरणे तसेच, पक्षातील प्रवेशाबाबत अनेकदा चर्चा केली होती. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीआधी ही चर्चा थांबल्याने तसेच, त्याच काळात किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वावर तीव्र टीका केल्यामुळे प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशाबाबत संदिग्धता निर्माण झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress focuses lok sabha seats strategic meeting upcoming elections ysh
First published on: 17-04-2022 at 00:02 IST