मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीवरुन शाब्दिक युद्द रंगलं असून यादरम्यान काँग्रेसने मंगळवारी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवावस्थानी पोहोचून २१ लाख शेतकऱ्यांची यादी सोपवली. या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आला असल्याचा दावा सरकार करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांच्या नेतृत्त्वात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते खुल्या जीपमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी घेऊन शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी दाखल झाले. शिवराज सिंह चौहान यांच्याकडे ही २१ लाख शेतकऱ्यांची यादी सोपवण्यात आली. ही यादी जिल्ह्याप्रमाणे विभागण्यात आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांनी सांगितलं की, ‘राज्यात काँग्रेस सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. कमलनाथ यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस सरकार गठीत होताच कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. आतापर्यंत २१ लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात आलं आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी आणि सर्व माहिती असणारं पेन ड्राइव्ह माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे’.

काँग्रेसचा दावा आहे की, ‘जय जवान-जय किसान कर्जमाफी योजने’अंतर्गत एकूण ५५ लाख शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी जवळपास २१ लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आहे. त्यांना कर्जमाफी झाल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार उर्वरित शेतकऱ्यांचं कर्जही माफ केलं जाणार आहे. भाजपा आपण शेतकरी हित पाहत असल्याचं सांगत त्यांना भरकटवत आहे’.