पीटीआय, बंगळूरु, नवी दिल्ली : Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये २२४पैकी १३६ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. त्यामुळे ‘दक्षिणेचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाणारे एक महत्त्वाचे राज्य भाजपला गमवावे लागले आहे. तब्बल १० वर्षांनी काँग्रेसला कर्नाटकच्या जनतेने पुन्हा एकदा संपूर्ण सत्ता बहाल केली असताना आता मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
महिन्याभर प्रचाराचा धुरळा उडाल्यानंतर १० मे रोजी एकाच टप्प्यात कर्नाटक विधानसभेसाठी मतदान झाले. शनिवारी सकाळी आठ वाजता मजमोजणी सुरू झाली, तेव्हापासूनच काँग्रेसने आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकविली. २०१८ साली जिंकलेल्या जागांपेक्षा तब्बल ५६ जागा जास्त जिंकून काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. तर सत्ताधारी भाजपने ३९ जागा गामाविल्या असून त्यांना अवघ्या ६५ जागांवर विजय मिळविता आला आहे. बोम्मई सरकारमधील तब्बल १५ मंत्रीही पराभूत झाले आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या जागांमध्ये १८ने घट झाली असून कुमारस्वामी यांच्या पक्षाला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
या दिग्विजयानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘नफरत का बाजार बंद, मोहब्बत की दुकाने शुरू’ अशा शब्दांत आपला आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन करतानाच निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम केलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पराभव मान्य केला असून त्यामागील कारणांवर विचारमंथन केले जाईल, असे म्हटले आहे.
काँग्रेसला उभारी देणारा निकाल
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसला प्रथमच एका मोठय़ा राज्यात एवढा प्रचंड विजय मिळाला आहे. देशभरातील निवडणुकांमध्ये सातत्याने आक्रसत चाललेल्या सर्वात जुन्या पक्षाला मोक्याच्या क्षणी उभारी दिली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये वर्षांअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ताकदवान भाजपशी दोन हात करताना कर्नाटकचा विजय उत्तेजना देणारा ठरेल. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवरही हा निकाल परिणाम करणारा ठरू शकेल.
कर्नाटकात द्वेषाची बाजारपेठ बंद झाली असून प्रेमाचे दुकान सुरू झाले आहे. आम्ही कोणत्याही द्वेष भावना, वाईट भाषा यांचा वापर न करता निवडणूक लढवली त्याबद्दल आनंद वाटतो. राज्याचे लोक, पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांचे मी आभार मानतो.
– राहुल गांधी, काँग्रेस नेते
कर्नाटक निवडणुकीमधील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. कर्नाटकमध्ये आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर मेहनतीचे कौतुक आहे. आगामी काळात आम्ही कर्नाटकसाठी अधिक जोमाने काम करू.