पीटीआय, जयपूर : राजस्थान काँग्रेसमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट संघर्षांचा नवा अंक रविवारी सुरू झाला. मुख्यमंत्री गेहलोत यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीपूर्वीच गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनाम्याचा इशारा देत विधानसभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठले. त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार संकटात आले आहे. 

 अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे विधिमंडळ गटाचा नवा नेता निवडण्यासाठी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचे प्रभारी अजय माकन आणि पक्षनिरीक्षक म्हणून मल्लिकार्जुन खरगे बैठकीला उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही दाखल झाले. बैठकीमध्ये केवळ नेतानिवडीचे सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे गेहलोत यांनी स्वत: जाहीर केले होते. मात्र बैठकीपूर्वी त्यांच्याच समर्थकांनी राजीनामास्त्र उगारले.

गेहलोत समर्थक आमदार बैठकीकडे फिरकले नाहीत. त्याऐवजी ते मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर जमून बसमधून विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या घरी गेले. पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास या आमदारांचा विरोध आहे. यावेळी अपक्षांसह सुमारे ८० आमदार एकत्र असल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. ‘‘आपण राजीनामे देण्यासाठी आलो आहोत,’’ असे राज्यमंत्री प्रतापसिंह खचारियावास यांनी जाहीर केले, तर ‘‘आमदारांच्या भावना लक्षात न घेता निर्णय घेतला गेला, तर सरकार अडचणीत येईल,’’ असा इशारा अपक्ष आमदार सन्यम लोढा यांनी दिला.

 गेहलोत पक्षाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या खुर्चीत पायलट यांना विराजमान करण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतल्याची चर्चा आहे. गेहलोत यांना स्वत:च्या मर्जीतील आमदाराला मुख्यमंत्रीपद द्यायचे आहे. त्यामुळे पायलट आणि गेहलोत यांच्यामध्ये पुन्हा सत्तासंघर्षांची ठिणगी पडली आहे. यावर सर्वमान्य तोडगा काढण्याची कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागणार आहे.

नाराज आमदारांची मागणी काय?

२०२०मध्ये पायलट यांच्या बंडावेळी सरकार वाचवणाऱ्यांपैकी एखाद्याला मुख्यमंत्री करावे, बंड घडवणाऱ्यांना नव्हे, अशी गेहलोत समर्थक आमदारांची मागणी आहे. गेहलोत पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशी दोन्ही पदे सांभाळण्यासही सक्षम असल्याचा दावा समर्थक करत आहेत. २०२०मध्ये पायलट यांनी काही आमदारांसह बंडाचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

संख्याबळ असे..

राजस्थान विधानसभेच्या २०० सदस्यांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ १०८ आहे. शिवाय पक्षाला १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. अपक्षांमध्येही गेहलोत समर्थक अधिक आहेत. भाजपचे संख्याबळ ७० आहे. काँग्रेसच्या गेहलोत समर्थक ८० हून अधिक आमदारांनी राजीनामा दिल्यास सरकार कोसळू शकेल.