Congress On Election Commission Allegations : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी काही पुराव्यांचं सादरीकरण केलं होतं. त्यांच्या या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. राहुल गांधींच्या या आरोपानंतर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर टीका केली. तसेच राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांबाबत बोलताना निवडणूक आयोगाने राहुल गांधींना इशारा दिला.
राहुल गांधींना पुराव्यांसह प्रतिज्ञापत्र ७ दिवसांत द्यावं, अन्यथा जाहीर माफी मागावी अन्यथा हे आरोप खोटे समजले जातील, असं निवडणूक आयोगाने म्हटलं. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. ‘निवडणूक आयोग आता त्यांच्या अक्षमतेसाठीच नव्हे तर पक्षपातासाठी देखील उघड झाला आहे. निवडणूक आयोगाने धमकावण्याऐवजी चौकशी करणे योग्य ठरेल’, असं म्हणत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी टीका केली आहे.
जयराम रमेश यांनी काय म्हटलं?
“आज भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. ही पहिलीच वेळ होती जेव्हा नवे निवडणूक आयुक्त थेट बोलत होते, सूत्रांद्वारे नाही. काल निवडणूक आयोगाने मतदार यादी दुरुस्तीची जबाबदारी राजकीय पक्ष आणि व्यक्तींवर टाकण्यासाठी एक ‘प्रेस नोट’ जारी केली होती. या प्रेस नोटवर विरोधी पक्षांनी टीका केली आणि सामान्य जनतेकडून त्याला मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिसाद मिळाला. आजची पत्रकार परिषद अशा वेळी झाली जेव्हा तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा प्रत्येक युक्तिवाद फेटाळून लावला आणि बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या ६५ लाख मतदारांची यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने म्हटलं होतं की या मतदारांची संपूर्ण माहिती सहज शोधता येईल अशा स्वरूपात उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच आधारला मतदार ओळखीचा पुरावा म्हणून मान्यता देण्यात आली. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या या सर्व सूचनांना विरोध केला होता”, असं जयराम रमेश यांनी म्हटलं.
“आज राहुल गांधींनी सासाराम येथून मतदान अधिकार यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही आयुक्तांनी घेतली आणि सांगितलं की आम्ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात कोणताही भेदभाव करत नाहीत. मतदान प्रक्रियेत अनियमिततेबाबत विरुद्ध बरेच पुरावे आहेत. अशा परिस्थितीत हे विधान केवळ हास्यास्पद म्हणता येईल. हे लक्षात घेण्यासारखं आहे की राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नांना मुख्य निवडणूक आयुक्तांनी कोणतंही अर्थपूर्ण उत्तर दिले नाही”, असं जयराम रमेश म्हणाले.
आज भारत के चुनाव आयोग ने एक प्रेस कॉन्फ्रेंस की। यह पहला अवसर था जब यह ‘नया’ चुनाव आयोग सूत्रों के जरिए नहीं बल्कि सीधे बोल रहा था।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 17, 2025
कल, चुनाव आयोग ने एक ‘प्रेस नोट’ जारी किया था, जिसका उद्देश्य मतदाता सूची में सुधार की ज़िम्मेदारी राजनीतिक दलों और व्यक्तियों पर डालना था। इस…
“आता खरा प्रश्न असा आहे की, निवडणूक आयोग बिहारमधील एसआयआर प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या १४ ऑगस्ट २०२५ च्या आदेशांची अंमलबजावणी करेल का? ते तसं करण्यास घटनात्मकदृष्ट्या बांधील आहेत. संपूर्ण देश वाट पाहत आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींना दिलेल्या धमक्यांबाबत एवढंच म्हणणं पुरेसं आहे की लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने निवडणूक आयोगाच्या स्वतःच्या आकडेवारीतून समोर आलेली तथ्येच मांडली आहेत. निवडणूक आयोग आता केवळ त्यांच्या अक्षमतेसाठी नव्हे तर त्यांच्या उघड पक्षपातासाठी देखील उघड झाला आहे. निवडणूक आयोगाने धमकावण्याऐवजी चौकशी करणं योग्य ठरेल”, असं जयराम रमेश यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी काय म्हटलं?
राहुल गांधी यांना सात दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल असे ठणकावून सांगताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की “सर्वात मोठी मतदार यादी आपल्याकडे आहे, जवळपास ९० ते १०० कोटींच्या दरम्यान….सर्वात मोठी मतदार यादी, सर्वात मोठी निवडणूक कर्मचाऱ्यांची फौज, सर्वात जास्त मतदान करणाऱ्या लोकांची संख्या आणि या सर्वांच्या समोर हे म्हणणे की, जर मतदार यादीत तुमचे नाव दुसऱ्यांदा असेल तर तुम्ही दोन वेळा मतदान केले असेल आणि कायदेशीर गुन्हा केला असेल… माझ्यासह सर्व मतदारांना आरोपी बनवलं… आणि निवडणूक आयोग शांत बसेल? शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल. तिसरा पर्याय नाही. सात दिवसांत जर प्रतिज्ञापत्र जर मिळाले नाही तर याचा अर्थ हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि आमच्या मतदारांना ते बनवट आहेत असे म्हणणारा जो कोणी असेल त्याने माफी मागितली पाहिजे,” असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं.