कर्नाटकातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विरोधी काँग्रेस पक्षाने अत्यंत लक्षणीय कामगिरी करत आघाडी घेतली असून सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला धक्कादायक तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. येत्या मे मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असून त्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला मिळालेले यश दिलासा देणारे आहे.
बहुतेक नगरपालिका, महापालिकेत झालेल्या बहुरंगी लढतीत माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौंडा यांच्या जनता दलाने (धर्मनिरपेक्ष ) ८७० जागा मिळवत दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्यातील ५ हजार वॉर्डासाठी निवडणूक झाली. दुपारी जाहीर झालेल्या ४ हजार ५०० वॉर्डापैकी काँग्रेसने १८०० जागा जिंकल्या असून जनता दलाने दुसरा क्रमांक गाठताना ८७० जागा जिंकल्या आहेत. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला ८०० जागा जिंकता आल्या आहेत. भाजपला रामराम ठोकून वेगळा पक्ष काढणााऱ्या बी.एस.येडीयुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाने व भाजपचे माजी मंत्री बी.श्रीरामुलू यांच्या बीएसआर काँग्रेसने भाजपचे मोठे नुकसान केल्याचा अंदाज आहे. या दोघांच्या पक्षाने अनुक्रमे २५० व ७७ च्या आसपास जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनीही ६५० पेक्षा अधिक जागा जिंकत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. २००७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ५००७ जागांपैकी काँग्रेसने १६०६, जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) १५०२ तर भाजपने ११८० जागा जिंकल्या होत्या. राज्यातील ७ महापालिका, ४३ नगरपालिका, ६५ नगरपरिषदा, ९२ शहर पंचायतीसाठी ७ मार्चला मतदान झाले होते. त्याचा आज निकाल लागला.
काँग्रेसने दावणगेरे, मंगलोर, बेल्लारी महापालिका जिंकल्या असून म्हैसूर, गुलबर्गा येथे कोणालाच बहुमत मिलाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा वाजविणारा हा निकाल असून भाजपचा सुफडासाफ होईल असे काही जणांना वाटत होते, तसे काही झालेले नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री जगदीश शेट्टर य़ांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2013 रोजी प्रकाशित
कर्नाटकात काँग्रेसचा ‘जय हो’
कर्नाटकातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विरोधी काँग्रेस पक्षाने अत्यंत लक्षणीय कामगिरी करत आघाडी घेतली असून सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला धक्कादायक तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. येत्या मे मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असून त्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला मिळालेले यश …
First published on: 12-03-2013 at 03:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress jay ho in karnataka