भाजपाची सत्तात असणाऱ्या मध्य प्रदेशमधील रीवा येथील आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मुंबईमध्ये अडकलेल्या काही मजुरांना सोडवण्यासाठी थेट अभिनेता सोनू सूदची मदत मागितल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. स्वत: सत्ताधारी पक्षाचे आमदार असून मुंबईत अडकलेल्या आपल्याच राज्यातील कामगारांना घरी आणण्यासाठी भाजपा नेत्याला अभिनेत्याची मदत घ्यावी लागत असल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विटवरुन नाराजी व्यक्त केली. आम आदमी पार्टीमधून काँग्रेसमध्ये आलेल्या लांबा यांनी ट्विटवरुन शुक्ला यांना सुनावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“डोळ्यांवर माझा विश्वास बसत नाहीत. जी व्यक्ती स्वत: आमदार आणि माजी मंत्री आहे, ज्यांच्या पक्षाची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याच पक्षाचे आहेत, इतकच काय महाराष्ट्रातही यांचे (भाजपाचे) खासदार आणि आमदार आहेत. तरीही मदत सोनू सुदकडे मागत आहेत. थोडी जरी लाज असली तर राजीनामा देऊन घरी बसा. ते चांगलं होईल,” असा टोला लांबा यांनी ट्विटवरुन लगावला आहे.

काय मागणी केली होती भाजपाच्या आमदाराने

रीवामधील भाजपाचे आमदार शुक्ला यांनी ट्विटवरुन सोनू सूदला टॅग करत मध्य प्रदेशमधील ४१ अडकलेल्या कामगारांची यादी ट्विट केली होती. “सोनू सूदजी मध्य प्रदेशमधील रेवा आणि सतना येथील काही नागरिक मुंबईमध्ये अडकलेले असून अद्याप ते परत आलेले नाहीत. या लोकांना परत त्यांच्या राज्यात आणण्यासाठी आम्हाला मदत करा,” असं शुक्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. या ट्विटला सोनूनेही उत्तर दिलं होतं. “सर, आता कोणाही कुठेही अडकणार नाही. उद्या तुमच्या या प्रवाशांना तुमच्या राज्यात पाठवू सर. कधी मध्य प्रदेशला आलो तर पोहे नक्की खायला घाला मला,” असं उत्तर सोनूने या ट्विटला दिलं आहे.

सोनूच्या या मदतीनंतर शुक्ला यांनी ट्विटवरुन सोनूचे आभार मानले आहेत. मध्य प्रदेशमध्ये तुमचे कायमच स्वागत आहे असं म्हणत शुक्ला यांनी सोनूने केलेल्या मदतीबद्दल त्याला धन्यवाद म्हटले आहे.

शुक्ला यांच्या या ट्विटखालीही अनेकांनी आमदारालाच अभिनेत्याची मदत मागावी लागत असेल तर ही कोणताही लोकशाही आहे असा प्रश्न काही जणांनी विचारला आहे.सोनू सूद मागील काही आठवड्यांपासून लॉकडाउनमुळे मुंबईबरोबर देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. सोनूने सुरु केलेल्या घर भेजो मोहिमेअंतर्ग आतापर्यंत हजारो मजुरांना त्याने घरी पाठवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader alka lamba slams bjp mla rajendra shukla for asking help from sonu sood scsg
First published on: 05-06-2020 at 08:37 IST