काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे की या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी. त्यासाठी आपण हे पद सोडत आहोत. प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये या पदावर राहिलेले आनंद शर्मा यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळए आता पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसला तरुण नेता शोधावा लागणार आहे. आनंद शर्मा हे मागील दहा वर्षांपासून या पदावर होते.
आनंद शर्मा यांनी काय म्हटलं आहे?
आनंद शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनाम्याचे पत्र लिहिलं आणि आपली इच्छाही व्यक्त केली. आनंद शर्मा यांनी म्हटले की, ‘मी काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष दोघांनाही आधी सांगितले आहे की, माझ्या मते समितीची पुनर्रचना करावी जेणेकरून चांगली क्षमता असलेल्या तरुण नेत्यांना त्यात समाविष्ट करता येईल. यामुळे समितीच्या कामकाजात सातत्य राहील. पुढे लिहिताना शर्मा यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. गेल्या काही दशकांमध्ये समितीने आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्षांसोबत काँग्रेसचे संबंध मजबूत केले आहेत. परराष्ट्र व्यवहार विभागाने काँग्रेस विचारसरणीचे राजकीय पक्ष आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. याचा मोठा फायदा पक्षाला झाला आहे असंही आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे.
आनंद शर्मा काँग्रेसचं आंतरराष्ट्रीय स्तरावर करत होते प्रतिनिधित्व
१) ज्येष्ठ नेते आनंद शर्मा हे काँग्रेस कार्यकारिणी समिती (सीडब्ल्यूसी) चे सदस्य आहेत. ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. तसेच शर्मा हे जवळजवळ चार दशकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होते. दहा वर्षांपासून ते या विभागाचे अध्यक्ष आहेत.
२) ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळांतही आनंद शर्मा यांचा सहभाग होता.
३) आनंद शर्मा यांनी भारत-अमेरिका यांच्यातील अणु कराराच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अणु पुरवठादार गट (NSG) मध्ये भारताला सूट मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी पहिले भारत-आफ्रिका शिखर परिषदेचे आयोजन केले होते.
४) यूपीएच्या कार्यकाळात आनंद शर्मा देशाचे वाणिज्य मंत्री देखील होते. त्यांच्या कार्यकाळात पहिला जागतिक व्यापार संघटनेचा करार आणि व्यापक व्यापार करार झाला होता. आता त्यांनी काँग्रेसमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि तरुण नेतृत्वाला संधी द्यावी असं म्हटलं आहे.