Congress On Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा जगातील अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावरही २५ टक्के टॅरिफ लादलं. त्यानंतर पुन्हा ६ ऑगस्ट रोजी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यानुसार भारतावरील अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू झालं आहे. दरम्यान, अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क आता ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे.

ट्रम्प यांनी लादलेल्या या अतिरिक्त टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत निर्यात करण्यासाठी ५० टक्के टॅरिफ भरावा लागणार आहे. याचा भारतातील अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसणार असून हजारो नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील कर बुधवारपासून अधिकृत दुप्पट म्हणजे ५० टक्के केल्याच्या निर्णयावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय भारतासाठी मोठी डोकेदुखी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी या सर्व घडामोडींवर एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी म्हटलं की, “डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दुहेरी आयातशुल्क लागू झालं आहे. याचा अमेरिकेला होणाऱ्या आपल्या कामगार-केंद्रित निर्यातीवर विशेषतः कापड, रत्ने आणि दागिने, चामडे, सागरी उत्पादने आणि अभियांत्रिकीवर निःसंशयपणे परिणाम होईल.”

“गेल्या चोवीस तासांत अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांनी H1B व्हिसा प्रणालीविरुद्ध देखील आवाज उठवला आहे. त्याचे सर्वात मोठे लाभार्थी भारतीय आयटी व्यावसायिक आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या यांच्या MAGA समर्थकांच्या प्रमुख मागण्यांपैकी ही एक आहे. पंतप्रधान मोदींनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या तथाकथित विजयी सूत्र MAGA+ MIGA= MEGA मध्ये वापरलेला तोच MAGA. मोदींनी तयार केलेला हा MEGA आता भारतासाठी मोठी डोकेदुखी बनला आहे”, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.

MIGA + MAGA = MEGA काय आहे?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी अमेरिका दौरा केला होता. तेव्हा त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं की, “मेक अमेरिका ग्रेट अगेन (Make America Great Again -MAGA). तसेच भारतही २०४७ पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. मात्र, अमेरिकेच्या भाषेत सांगायचं झालं तर मेक इंडिया ग्रेट अगेन (Make India Great Again=MIGA). पण जेव्हा मिगा आणि मागा एकत्र येतात तेव्हा समृद्धीसाठी मेगा (MEGA) पार्टनरशिप होते”, असं मोदींनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वाक्यावरून आता काँग्रेसने टीका केली आहे.