Congress leader Shashi Tharoor : काँग्रेस पक्ष व खासदार शशी थरूर यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा पक्षातील सहकाऱ्यांशी संघर्ष चालू आहे. थरूर बऱ्याचदा सरकारबाबत मवाळ भूमिका घेताना दिसतात. तर, काही वेळा पक्षाच्या भूमिकेशी सहमत दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे पक्षातील सहकारी त्यांच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकदा थरूर यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना सहकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच थरूर यांच्या आणीबाणीबाबत वक्तव्यावर काँग्रेसचे नेते माणिकम टागोर यांनी आक्षेप नोंदवला होता. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी शशी थरूर यांच्यावरील नाराजी प्रकट केली आहे.
के. मुरलीधरन म्हणाले, “थरूर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरील त्यांची भूमिका बदलत नाहीत तोवर त्यांना राज्याच्या (केरळ) राजधानीत पक्षाने आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जाणार नाही. कांग्रेस कार्यकारिणी समिती आता थरूर यांना आमच्यापैकी एक मानत नाही. पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व शशी थरूर यांच्यावरील कारवाईबाबतचा निर्णय घेईल.”
थरूर यांच्या भूमिकेवर काँग्रेस नाराज
काँग्रेस नेते मुरलीधरन म्हणाले, “शशी थरूर जोवर त्यांच्या भूमिका बदलत नाहीत तोवर आम्ही त्यांना तिरुवनंतपुरममध्ये आयोजित होणाऱ्या पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केलं जाणार नाही. कारण ते आता आमच्याबरोबर नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.”
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर शशी थरूर केंद्र सरकारचं समर्थन करताना दिसतात. तसेच ते म्हणाले होते की राष्ट्र सर्वोच्च असतं आणि पक्ष हे देशाला अधिक उत्तम बनवण्याचं माध्यम असतात. त्यावर मुरलीधरन यांनी आक्षेप घेतला आहे.
शशी थरूर काय म्हणाले होते?
काँग्रेस खासदार शशी थरूर शनिवारी कोची येथील एका कार्यक्रमात म्हणाले, “देशाच्या सीमेवर अलीकडेच जे काही झालं त्यानंतर मी आपली सशस्त्र दलं व केंद्र सरकारचं समर्थन केलं होतं. ते पाहून अनेकांनी माझ्यावर टीका केली. मात्र, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि ठाम राहीन. कारण मला असं वाटतं की देशासाठी हे योग्य नाही.” याआधी थरूर म्हणाले होते की “माझ्यासारखे लोक जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी इतर पक्षांना केंद्र सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन करतात तेव्हा माझ्याच पक्षातील लोकांना ती कृती विश्वासघातासारखी वाटते, ही मोठी समस्या आहे.”