पीटीआय, इम्फाळ
२१ महिन्यांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धगधगत असलेल्या मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या धोरणावर विरोधकांनी टीका केली आहे. भाजपमधील अंतर्गत वादामुळेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली, असा आरोप काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष केशम मेघचंद्र यांनी केला. भाजपमधील अंतर्गत नेतृत्व संकट आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत एकमत नसल्यानेच भाजपला राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राज्यात आजवर झालेल्या हिंसाचारात २५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ २०२७ पर्यंत आहे.

जबाबदारी टाळण्याची पळवाट

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे हा ‘उपाय नाही’ तर राज्यात सुरू असलेल्या जातीय हिंसाचारासाठी ‘जबाबदारी टाळण्याची’ पळवाट असल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला म्हणाल्या.

राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रामाणिक राजकीय इच्छाशक्तीवर भर दिला. तसेच निवडणुका बदल घडवून आणणार नसल्याचा दावादेखील केला.

दरम्यान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये अशाच प्रकारची जातीय हिंसा घडली असती तर केंद्र गप्प बसले असते, असा दावादेखील शर्मिला यांनी केला.

गेल्या दोन वर्षांपासून मणिपूर जळत असताना केंद्र सरकार मूकदर्शक बनून राहिले असा आरोप करतानाच मुंबई किंवा दिल्लीसारख्या शहरांमध्ये अशीच परिस्थिती महिनोनमहिने राहिली असती तर कल्पना करू शकता का? असा सवाल करतानाच मणिपूर दूरवर असल्यामुळे ईशान्येची कोणालाच चिंता नसल्याचे इरोम शर्मिला म्हणाल्या.

भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी हिंसाचारग्रस्त राज्यात अखेर वास्तविक परिस्थिती समजून घेण्यास सुरुवात केली आहे. आता संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान मोदींवर आहे. ते सरकारच्या निष्क्रियतेची दखल घेतील आणि राज्यात संकट सोडविण्यास सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे.

केशम मेघचंद्र, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस</strong>

पंतप्रधान जनतेची माफी मागतील?

मणिपूरमध्ये भाजपच्या ‘अक्षमते’चे ओझे एकही आमदार स्वीकारण्यास तयार नसल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मणिपूरला भेट देऊन तेथील जनतेची माफी मागण्याची हिंमत दाखवू शकतील का, असा प्रश्नही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाच अतिरेक्यांना अटक

इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व आणि थौबल जिल्ह्यांमधून प्रतिबंधित संघटनांशी संबंधित पाच अतिरेक्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. गुरुवारी इम्फाळ पश्चिमेतील थांगमेईबंद आणि केशमपट येथून प्रतिबंधित ‘कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी’च्या (नोयोन) दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. तर इम्फाळ पूर्वेतील खुराई थौडम लीकाई येथून पोलिसांनी आणखी एका सदस्याला अटक केली. हा अतिरेकी खंडणीमध्ये सहभागी असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर थौबल जिल्ह्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.