पोलीस कोठडीत मरण पावलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बुधवारी आग्य्राला जात असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी थांबवले आणि नंतर पोलीस लाइन्स येथे नेले.
संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुठल्याही राजकीय व्यक्तीला तेथे जाऊ देऊ नये अशी विनंती आग्य्राच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केली होती व त्यामुळे प्रियंका यांना लखनऊ- आग्रा एक्स्प्रेसवेवर थांबवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
‘त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही किंवा अटक करण्यात आलेली नाही. प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीत अडथळे येत होते. त्यामुळे त्यांना आधी पक्ष कार्यालयात किंवा त्यांच्या निवासस्थानी जाण्यास सांगण्यात आले होते, मात्र ते त्यांनी मान्य न केल्यामुळे त्यांना पोलीस लाइन्समध्ये पाठवण्यात आले’, असे लखनऊचे पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांनी सांगितले.
पोलीस कोठडीत मरण पावलेल्या एका सफाई कामगाराच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका आग्य्राला जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले, असा दावा काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने केला होता. याबाबत कुशीनगर येथे पत्रकारांनी प्रशद्ब्रा विचारला असता, ‘कायदा व सुव्यवस्था सर्वोच्च असून, कुणालाही तिच्याशी खेळण्याची मुभा दिली जाणार नाही’, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.