करोना लशींवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी ते सोडत नाही. आता राहुल गांधी यांनी मोदी सरकारला थेट मला अटक करा असं आव्हान दिलं आहे. तर प्रियंका गांधी या्ंनी आपला प्रोफाईल फोटो बदलत सरकारचा निषेध केला आहे.

करोना लशींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. तर १७ जणांना अटक केली आहे. हाच मुद्दा पकडत आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मलाही अटक करा असं आव्हान करत पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये “मोदी जी, हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” असा मजकूर आहे. तर राहुल गांधी यांनी आपला प्रोफाईल फोटोवरही पोस्टर ठेवलं आहे.


राहुल गांधी यांच्यानंतर लगेचच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही आपलं प्रोफाईल फोटो बदलत पोस्टर ठेवलं आहे. या पोस्टमुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात करोना लशींचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर अनेक जण लसीकरण केंद्रावर जाऊनही लस मिळत नसल्याने हैराण आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टरमुळे राजकारण तापलं आहे.