राहुल गांधींनी विदेशातून परत आल्यानंतर भाजपाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राहुल गांधी एक वाक्य बोलून गेले आणि जयराम रमेश यांनी लगेच त्यांना टोकलं. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून केली जाते आहे. त्या मागणीला उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
भाजपाला उत्तर देण्यासाठी जी पत्रकार परिषद राहुल गांधी यांनी घेतली त्यामध्ये राहुल गांधी म्हणाले की दुर्दैव (Unfortunately) आहे की मी एक खासदार आहे, मला आशा आहे की मला संसदेत बोलू दिलं जाईल. मी लोकसभेतच त्यांच्या मागणीला उत्तर देईन असं राहुल गांधी म्हणाले. तसंच भाजपाला जशी चर्चा हवी आहे तशी करायला मी तयार आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
जयराम रमेश यांनी राहुल गांधींना का टोकलं?
जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्या Unfortunately या शब्दावर राहुल गांधी यांना टोकलं. तसंच हे सांगत असताना माईक सुरू होता त्यामुळे जयराम रमेश यांनी राहुल गांधींना जो सल्ला दिला तोदेखील रेकॉर्ड झाला. जयराम रमेश म्हणाले की तुम्ही जे म्हणालात की दुर्दैवाने मी खासदार झालो. तुमच्या या वाक्याची खिल्ली उडवली जाऊ शकते. जयराम रमेश यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचं वक्तव्य बदललं. ते म्हणाले की दुर्दैव हे आहे की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. कारण माझ्यावर संसदेतल्या चार मंत्र्यांनी केले आहेत. त्यानंतर मला बोलण्याची संधीच दिली गेली नाही. बोलण्याची संधी दिली जाणं हा माझा नैतिक अधिकार आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मी भाजपाच्या मागणीला आणि त्यांच्या आरोपांना संसदेतच उत्तर देईन असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
जयराम रमेश आणि राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल
जयराम रमेश राहुल गांधी यांच्यातल्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर भाजपा नेते शहजाद पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शहजाद पूनावाला म्हणाले की जयराम रमेशजी आमच्यासाठी ही दुर्दैवाची बाब ही आहे की देशाच्या महान संसदेत एक असा खासदार आहे जो विदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करतो.