करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन जवळपास एक वर्ष उलटल्यानंतर पुन्हा एकदा करोनाचं भूत अवघ्या जगाच्या डोक्यावर येऊन बसण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. चीनमध्ये मोठ्या प्रमाणवार करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात भारतातही काही उपाययोजना करण्याची गरज आहे का? याबाबत केंद्रीय पातळीवर विचार केला जात आहे. मात्र, दुसरीकडे यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही सुरू झालं आहे. चीनमध्ये वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतात नियमांचं पालन होत नसेल तर काँग्रेसची भारत जोडो यात्रा स्थगित करावी, असं पत्रच केंद्राकडून काँग्रेसला पाठवण्यात आलं आहे. यावरून आता काँग्रेसनं केंद्र सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

नेमकं झालं काय?

गेल्या काही दिवसांत चीन आणि मध्य आशियामध्ये करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यावर स्थानिक पातळीवर उपाययोजनाही केल्या जात आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर इतर देशांकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती पावलं उचलण्यासंदर्भात विचार सुरू झाला आहे. भारतातही याबाबत केंद्रीय पातळीवर बैठका घेतल्या जात असून चीनसारखी परिस्थिती भारतात उद्भवू नये, यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील? यावर खल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी राहुल गांधींना पाठवलेल्या एका पत्रामुळे राजकीय सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.

काय आहे या पत्रात?

आरोग्यमंत्र्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रातून ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान करोनासंदर्भातील नियमांचं पालन करण्याची सूचना केली आहे.”भारत जोडो यात्रेमध्ये कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचना पाळल्या जाणं आवश्यक आहे. मास्क-सॅनिटायझरचा वापर करणं, फक्त लसीकृत लोकांनाच यात्रेत प्रवेश देणं अशा गोष्टींचं काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे”, असं पत्रात नमूद केलं आहे. तसेच, “या नियमांचं पालन होत नसेल, तर भारत जोडो यात्रा स्थगित करा”, असंही पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

“भाजपा किती घाबरली ते दिसतंय”

दरम्यान, याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी खोचक शब्दांत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “या पत्रावरून भारत जोडो यात्रेमुळे भाजपा किती घाबरली आहे हे दिसून येते. ट्रम्पजींना नमस्ते म्हणताना, मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडताना, बंगालमध्ये प्रचार करताना तेव्हाच्या आरोग्य मंत्र्याने मोदीजींना हा सल्ला देण्याची हिंमत दाखवली असती, तर देशात कोरोना वाढला नसता”, असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

Bharat Jodo Yatra: “…नाहीतर ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करा”; ‘राष्ट्रहिता’चा उल्लेख करत मोदी सरकारचं राहुल गांधींना पत्र

“…तेव्हा हे मांडवीया मांडी घालत…”

“मोदीजींनी गुजरातमध्ये ५१ किमी रोड शो केला तेव्हा हे मनसुख मांडवीया मांडी घालत हाताची घडी तोंडावर बोट ठेवून होते. कोरोनामध्ये राहुल गांधींच्या इशाऱ्यानंतरही एक मंत्री ‘हर्ष’वर्धन करीत बसले. आता एक मोदींना ‘मनसुख’ देण्याचा प्रयत्न करत आहेत. यात्रा योग्य मार्गावर आहे हे स्पष्ट आहे”, असाही टोला या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चीनमधील वाढत्या करोनाबाधितांमुळे सर्वच देश सतर्क झाले आहेत.