काँग्रेसचे नेते सैफुद्दीन सोझ यांनी जम्मू-काश्मीरसंदर्भात वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. काश्मीरच्या लोकांची पहिली प्राथमिकता ही स्वातंत्र्य मिळवणे असून सध्याच्या स्थितीत काश्मीरच्या स्वातंत्र्याशी निगडीत देशांमुळे हे शक्य होणार नाही, असे म्हणत काश्मीरचे लोक पाकिस्तानमध्ये त्यांचे विलिनीकरन करू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हे खरे असले तरी असे होणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोझ यांना पाकिस्तानबद्दल एवढाच कळवळा असेल तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन राहावे, असा खोचक सल्ला शिवसेनेने दिला आहे.

हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सोझ यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. काश्मीरच्या लोकांची पहिली प्राथमिता ही स्वातंत्र्य मिळवणे आहे. त्यांना ना भारतात राहायचे आहे ना पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचे आहे. काश्मीरच्या लोकांना शांततेची गरज आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच आपल्या वक्तव्याशी काँग्रेसचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. मी वैयक्तिकरित्या काश्मीरच्या लोकांच्या वतीने हे बोलत असल्याचेही ते म्हणाले.

सरकारने काश्मीरमधील सर्व पक्षांशी चर्चा केली पाहिजे. मी काश्मीरचा एक सक्रीय पक्षकार आहे आणि सरकारने त्यांच्याबरोबर अवश्य चर्चा केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. सोझ हे यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. जम्मू-काश्मीरचे ते मोठे नेते आहेत. सोझ यांनी काश्मीरच्या इतिहास आणि वर्तमानाशी निगडीत एक पुस्तक लिहिले आहे. त्याचे लवकरच प्रकाशन केले जाणार आहे.

मतदानाची वेळ आली तर काश्मीरचे लोक भारत किंवा पाकबरोबर जाण्यापेक्षा स्वतंत्र राहणे पसंत करतील, असे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सोझ यांनी समर्थन केले आहे.