मोदी सरकारने गोरगरिबांसाठी आखलेल्या मनरेगा योजनेवरील खर्चात कपात केल्याने अनेक गरजूंना बेरोजगार उपलब्ध नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी केला. मोदी सत्तेत आल्यापासून मनरेगाच्या निधीत तब्बल ४५ टक्क्य़ांनी कपात केली आहे. त्यासंबंधीची विस्तृत आकडेवारीच ओझा यांनी सादर केली.
मोदी सरकारच्या कार्यकाळात १३ हजार ६१८ कोटी रुपये मनरेगावर खर्च करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत याच कालावधीत काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने मनरेगावर २४ हजार ६७६ कोटी रुपये खर्च केला होता. भाजपने मात्र त्यात थोडीथोडकी नव्हे तर दहा हजार कोटी रुपयांची कपात केली आहे. मोदी व मनरेगाच्या निधीत कपात करण्याचा निर्णय घेणारे त्यांचे माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी ओझा यांनी केली.     दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आम आदमी पक्षाला समर्थन देऊ शकते, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केले आहे. त्यावर ओझा म्हणाल्या की, हे विधान दीक्षित यांचे वैयक्तिक मत आहे, पक्षाची अधिकृत भूमिका नाही असे स्पष्ट केले.