काँग्रेस प्रवक्ते आणि नेते राजीव त्यांगी यांचं बुधवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. राजीव त्यागी यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना त्याच परिस्थितीत गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक ठिकाणी राजीव त्यागी यांनी काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडली होती.

सकाळपासून त्यांची प्रकृती चांगली होती. याव्यतिरिक्त संध्याकाळी पाच वाजता त्यांनी एका हिंदी खासगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर घरी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

त्यांच्या निधनानंतर काँग्रेसनंही शोक व्यक्त केलं. आहे. “राजीव त्यागी यांच्या निधनामुळे आम्हाला दु:ख झालं आहे. ते एक पक्के काँग्रेसी आणि खरे देशभक्त होते. या कठिण काळात आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत,” असं काँग्रेसनं म्हटलं आहे.  तर त्यांच्यासोबत अनेकदा टीव्हीवरील डिबेटमध्ये सहभागी असलेल्या संबित पात्रा यांनीदेखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. “काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी हे माझे मित्र आज आमच्यासोबत नाहीत यावर विश्वासच बसत नाही. आज पाच वाजता आम्ही एका डिबेटमध्ये एकत्र होते. आपलं जीवन अनिश्चित आहे. माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत,” असं ते म्हणाले.