लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसने १७ जानेवारीला बैठक बोलावली आहे. यामध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांना घोषित केले जाणार काय याची चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या नावावर पक्षात सहमती असल्याचे काँग्रेस प्रवक्त्या प्रिया दत्त यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी लोकसभेत मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांच्या नावाची घोषणा करावी, अशी पक्षाची इच्छा आहे. १७ तारखेला जर तशी घोषणा झाली तर आम्हाला आनंद आहे असे त्या म्हणाल्या. आता लोकांना चेहरा हवा हे त्यांनी मान्य केले. राहुल गांधी यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने त्यांनी संघटनात्मक कामात रस घेतला. इतर जबाबदाऱ्यांच्या दृष्टीने पाहिले नाही, अशी सारवासारव प्रिया दत्त यांनी केली.
भाजपने सप्टेंबरमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मात्र काँग्रेस आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करीत नसल्याने चौफेर टीका सुरू होती. आता काँग्रेस या बैठकीत राहुल यांना बढती देऊन लोकसभेला मोदी यांच्या विरोधात सामना रंगणार काय असा प्रश्न आहे. चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी योग्य वेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करू, असे सांगितले होते. मात्र सोमवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर याबाबत प्रश्न विचारला असता सोनियांनी उत्तर देण्याचे टाळले.
काँग्रेस कार्यकारिणीने ही बैठक निश्चित केली आहे. त्यामुळे राहुल यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतचा प्रश्न गैरलागू असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.
गेल्या वर्षी जानेवारीत जयपूरमध्ये चिंतन शिबीर झाले होते. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. मोदी यांच्या रूपाने आव्हान उभे असताना काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही टीका केली होती. लोकांना कमकुवत नेतृत्व आवडत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी काँग्रेसला फटकारले होते. तर द्रमुकने काँग्रेससमवेत आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील नेत्यांच्या दबावापुढे आता राहुल यांचे नाव जाहीर होणार काय हा प्रश्न आहे.

भाजपची टीका
काँग्रेसपुढे फारच थोडे पर्याय आहेत. प्रतिनियुक्ती आणि घराणेशाही यातून त्यांना निवड करायची आहे. आता घराणेशाहीचा आधार घेऊ पाहत आहेत, अशी टीका उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली. तर कुणाला निवडायचे हा त्यांचा अधिकार आहे. लोकांना नाकारण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणीही वेंकय्या नायडू यांनी केली.

Story img Loader