MP Charanjit Channi on Surgical Strikes: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने याला चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी भावना सर्वच विरोधी पक्षांनी व्यक्त केली असून सरकार जी कारवाई करेल, त्याला आमचा पाठिंबा असेल असा संदेश दिला गेला. काँग्रेसनेही पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारच्या पाठिशी असल्याची भूमिका मांडली. मात्र आता काँग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नव्या विधानामुळे पुन्हा वाद उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.
खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी पत्रकार परिषदेत पहलगाम हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर भाष्य केले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात यावे, अशी भावना व्यक्त करत असताना त्यांनी २०१९ साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या सर्जिकल स्ट्राईकचा अद्याप एकही पुरावा समोर आलेला नाही, असे ते म्हणाले.
५६ इंचाची छाती काय कारवाई करणार?
चन्नी पुढे म्हणाले, “पहलगामवरील हल्ल्याला १० दिवस झाले तरी सरकारने अद्याप ठोस पाऊले उचलली नाहीत. आमची मागणी आहे की, पाकिस्तानविरोधात ठोस आणि कठोर कारवाई व्हावी. संबंध देश सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष ठेवून आहे. तथाकथित ५६ इंचाची छाती काय कारवाई करणार? याची लोक वाट पाहत आहेत. सरकारने यावर जलद निर्णय घेऊन पाऊले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे.”
सर्जिकल स्ट्राईक कुठे झाला?
२०१९ साली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान मारले गेले. या घटनेचा वापर सरकारने केला असल्याचा आरोप चन्नी यांनी केला. “पुलवामा घटनेनंतर भारताने पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केला, यात किती लोक मारले गेले, हे काही दिसले नाही. जर कुणी आपल्या देशात बॉम्ब फेकला, तर लोकांना कळणार नाही का? सरकारने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. पण वास्तवात काहीच घडले नाही. सर्जिकल स्ट्राईकचा एकही पुरावा नाही, कुणीही तो पाहिला नाही”, असा दावा खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी केला.
जम्मू आणि काश्मीरमधील भाजपाचे नेते रवींद्र रैना यांनी चन्नी यांच्या विधानावर जोरदार टीका केली. “भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा देशाशी गद्दारी केली आहे. भारतीय लष्कराच्या शौर्य आणि सन्मानावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस देशद्रोह्याचा गट बनला असून यासाठी देश त्यांना कधीच माफ करणार नाही”, अशा शब्दात रैना यांनी काँग्रेसवर टीका केली.