Congress MP Karti Chidambaram on Stray Dog Problem in India : कोणत्याही विकसीत देशात रस्त्यांवर कुत्री आणि मोकाट जनावरांची समस्या पाहायला मिळत नाही आणि आरोग्य आणि सुरक्षिततेची मोठी समस्या सोडवणे बाकी असताना, भारत जागतिक शक्ती होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगू शकत नाही, असे मत काँग्रसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी बुधवारी एनडीटीव्हीशी बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय धोरण लागू करावे अशी मागणी देखील केली.
ही गंभीर समस्या
“हा हसण्याचा मुद्दा नाही. ही खूप गंभीर समस्या आहे. ही एक वास्तविक समस्या आहे जी प्रत्येक दिवशी भारतातील प्रत्येक काना-कोपर्यात उद्भवत आहे. फक्त भारताच्या शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भारतात देखील ही समस्या आहे. आपल्या रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या बेसुमारपणे वाढत आहे. आणि आपल्याकडे यासाठी कोणतेही धोरण नाही, याचा सामना करण्यासाठी ना पुरेशी उपकरणे आहेत ना संसाधने. स्थानिक नगरपालिकांनी यावर उपाय करणे अपेक्षित आहे आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये स्थानिक संस्थांकडे निधी आणि ही समस्या सोडवण्यासाठीचे कसब नसते,” असे तामिळनाडूच्या शिवगंगा येथून खासदार असलेले चिदंबरम म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील एका महिलेने ती भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत असताना तीला त्रास देण्यात आल्याचा आरोप केला होता, यावर सर्वोच्च न्यायालयाने या महिलेला तिने हे स्वतःच्या घरात करावे असे सुनावले. यानंतर चिदंबरम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात भटक्या कु्त्र्यांनी लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींवरही हल्ला केल्याच्या अनेक घटना देशभरात समोर आल्या आहेत. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
“आपण जगातील टॉपच्या अर्थव्यवस्थेपैकी एक होण्याची महत्त्वकांशा बाळगू शकत नाहीत. आपण जगात सन्मान मिळेल अशी अपेक्षा करू शकत नाहीत. जर आपल्याकडे रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची समस्या असेल तर आपण मोठ्या संख्येने पर्यटक देशात येतील अशी अपेक्षा करू शकत नाहीत, ” असेही चिदंबरम पुढे म्हणाले.
राष्ट्रीय धोरण हवे
“आपल्याला एक राष्ट्रीय धोरण, एक नैतिक धोरण आणि एक मानवीय धोरण हवे आहे, ज्यानुसार डॉग शेल्टर बांधण्याची आवश्यकता आहे, ज्याला सरकारच्या शक्य असेल त्या शाखेकडून निधी पुरवला पाहिजे. कुत्र्यांना रस्त्यावरून काढून या केंद्रांमध्ये पाठवले पाहिजे. त्यांना तेथे ठेवले पाहिजे. त्यांचे निर्बिजीकरण आणि निर्जंतुकीकरण केले गेले पाहिजे. जर लोकांना त्यांची काळजी वाटत असेल तर त्यांनी या कुत्र्यांना दत्तक घेतले पाहेज. कुत्रे मोकळे फिरण्यासाठी नसतात,” असेही चिदंबरम म्हणाले.