पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक रोख्यांसंदर्भात आज भाष्य केले. जर निवडणूक रोखे नसते तर कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे कळले नसते, असे सांगत त्यांनी निवडणूक रोखे योजनेचे समर्थन केले. तसेच भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्यांमधून मिळालेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे विरोधी पक्षाला मिळाल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला. पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीनंतर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देत मोदींना काही प्रश्न विचारले आहेत.

राहुल गांधी काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त एवढेच समजून सांगावे की, एक दिवस सीबीआयची चौकशी सुरु होते, त्यानंतर लागलीच त्यांना (निवडणूक रोखे) पैसे मिळतात. त्यानंतर लगेचच त्या कंपनीची सीबीआय चौकशी बंद होते. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी थोडे समजून सांगावे. आता दुसरे सांगायचे झाल्यास हजारो करोड रुपयांचे पैसे (निवडणूक रोखे) कंपनी देते. त्यानंतर त्या कंपनीला कामाचे कंत्राट मिळते. याविषयीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावे. खरे तर हा सर्व प्रकार खंडणीचा आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

हेही वाचा : “…तर सगळ्यांना पश्चाताप होईल”; निवडणूक रोख्यांवरुन पंतप्रधान मोदींचा विरोधकांना इशारा

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

निवडणूक रोख्यांसंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “जर निवडणूक रोखे नसते तर कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे कळले नसते. तीन हजार कंपनीने निवडणूक रोखे खरेदी केले. यामधील २६ कंपन्यांवर कारवाई झालेली आहे. तर यामधील १६ कंपन्या अशा होत्या ज्यांच्यावर कारवाई झाली तेव्हा त्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले होते. आता या निवडणूक रोख्यांमधून भाजपाला फक्त ३७ टक्के पैसे मिळाले. मात्र, विरोधी पक्षाला उतरलेले ६३ टक्के पैसे मिळाले आहेत. त्यामुळे निवडणूक रोखे होते म्हणून आपल्याला या पैशांचा माग काढता आला. कोणत्या कंपनीने पैसे दिले? कसे दिले? कुठे दिले? त्यामुळे प्रामाणिकपणे विचार केला तर सगळ्यांना पश्चाताप होईल”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.