काँग्रेसमध्ये पक्षनेतृत्वावरून निर्माण झालेलं संकट तूर्तास शमलं असलं, तरी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद अजूनही सुरूच आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सहकारी जितीन प्रसाद यांची बाजू घेत पक्षातील अंतर्गत कलहावरून नेत्यांना सुनावलं आहे. काँग्रेसला भाजपावर हल्ले करण्याची गरज आहे, स्वतःच्या पक्षावरच नाही,” अशा शब्दात सिब्बल यांनी संताप व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या नेतृत्वाच्या वादावर काही दिवसांपूर्वी पडदा पडला. पुढील काही महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत वाद अजूनही शमले नसल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे नेते जितीन प्रसाद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेशातील जिल्हा काँग्रेसनं मंजूर केल्यानं कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांमध्ये कपिल सिब्बल व जितीन प्रसार यांचाही समावेश होता. प्रसाद यांची या पत्रावर स्वाक्षरी असून, ते काँग्रेस कार्यसमितीचे विशेष आमंत्रित सदस्यही आहेत.

प्रसाद यांच्याविरुद्ध मंजूर करण्यात आलेल्या ठरावावर सिब्बल यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. “दुर्दैवाची बाब म्हणजे उत्तर प्रदेशात जितीन प्रसाद यांना अधिकृतपणे लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेसनं स्वतःवर ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा भाजपावर सर्जिकल स्ट्राईककरून भाजपाला लक्ष्य करण्याची गरज आहे,” अशी टीका सिब्बल यांनी केली आहे.

सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांविरुद्ध उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हा कांग्रेसनं पाच ठराव मंजूर केले आहेत. यातील एक ठराव जितीन प्रसाद यांच्याबद्दलही आहे. पत्र लिहिल्या प्रकरणी प्रसाद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठरावही मंजूर केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress needs to target bjp with surgical strikes not its own bmh
First published on: 27-08-2020 at 16:36 IST