काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यावरून केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. पीएनबी घोटाळ्याची रक्कम २२ हजार कोटी असल्याचे सांगत राहुल गांधींनी एक ट्विट केले आहे. मुलांना २ तासात परीक्षा उत्तीर्ण होण्याची कल्पना देणाऱ्या पंतप्रधानांनी पीएनबी घोटाळ्यावर २ मिनिटेही भाष्य केलेले नाही. अर्थमंत्री अरूण जेटलीही यावर मौन साधून आहेत. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान मोदींनी मुलांना २ तासात परीक्षा कशी उत्तीर्ण करायची हे सांगितले. पण २२ हजार कोटींच्या बँकिंग घोटाळ्यावर ते २ मिनिटेही नाही बोलले. जेटली महोदयही लपून बसले आहेत. दोषींसारखी वर्तणूक बंद करा आणि बोला. राहुल गांधी यांनी नीरव मोदीच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीही ट्विट करून मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदींच्या मौनाप्रकरणी काँग्रेसने यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसने शनिवारी पक्षाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा केली होती. पंतप्रधानांनी मूकदर्शक होण्याऐवजी देशातील सर्वांत मोठ्या बँकेच्या घोटाळ्याप्रश्नी संपूर्ण माहिती देण्याची काँग्रेस मागणी करत असल्याचे म्हटले होते. या घोटाळ्याची सुरुवात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यावेळी झाली जेव्हा पंतप्रधानांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या आणि देशाचा सर्व पैसा बँकिंग प्रणालीमध्ये टाकला होता. यामुळेच नीरव मोदीला बँकांमधून पैसे उपलब्ध झाले, असा दावा राहुल गांधींनी शनिवारी केला होता. ते म्हणाले होते की, जनतेच्या या पैशांच्या घोटाळ्याला कोण जबाबदार आहे. या घोटाळ्याबाबत ज्या लोकांनी बोलू नये असे लोक आज स्पष्टीकरण देत आहेत. तर पंतप्रधानांवर या घोटाळ्याबाबत बोलण्याची जबाबदारी आहे, ते यावर गप्प बसले आहेत. इतक्या मोठ्या घोटाळ्याकडे पंतप्रधान दुर्लक्ष कसे करु शकतात.