पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘रियर व्ह्यू मिरर’ संबंधी वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता त्यांची क्रिकेटपटूशी तुलना केली आहे. मोदी हे असे क्रिकेटपटू आहेत जे, विकेटकिपरकडे पाहत फलंदाजी करतात. त्यांना हे माहीत नसते की चेंडू कुठून येतोय, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. जर सचिन तेंडुलकरने विकेटकिपरकडे पाहत फलंदाजी केली असतील तर त्याला धावा काढता आल्या असत्या का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.

आमचे पंतप्रधान असे क्रिकेटर आहेत जे विकेटकिपरकडे पाहतात आणि त्यांना हेही माहीत नसते की चेंडू कुठून येत आहे, अशा शब्दांत कर्नाटकमधील एका जाहीरसभेत त्यांनी मोदींवर टीका केली. काँग्रेसने भविष्याऐवजी आपल्या भूतकाळावर बोलले पाहिजे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्याचा राहुल गांधींनी समाचार घेतला. तत्पूर्वी, रायचूर जिल्ह्यात झालेल्या सभेतही राहुल गांधींनी मोदींवर टीकास्त्र सोडले होते. मोदींचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांना आता आपल्या सरकारच्या कामगिरीवर, त्यांनी मिळवलेल्या यशावर बोलले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

‘खोटी स्वप्ने दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेऊन उपयोग नाही’

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बेल्लारी येथे झालेल्या सभेतही राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती. जे तुम्हाला खोटी आश्वासने देतात, खोटी स्वप्ने दाखवतात त्यांच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. काँग्रेस पक्ष जे सांगतो ते करुन दाखवतो. नरेंद्र मोदींचे शब्द पोकळ असतात. ते जे बोलतात ते करीत नाहीत,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. संसदेतील आपल्या एक तासाच्या लांबलचक भाषणात नरेंद्र मोदी देशाच्या भविष्याबाबत, तरुणांच्या रोजगाराबाबत किंवा शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला तास केवळ काँग्रेस पक्षावरील टीकेवर आणि भूतकाळातील गोष्टी सांगण्यातच घालवला. देशाला यात रस नाही, तर आपल्या पंतप्रधानाकडून देशाच्या भविष्याबाबत ऐकण्यात रस आहे, असेही ते म्हणाले होते.