पीटीआय, दरभंगा (बिहार)
देशातील वंचित लोकसंख्येच्या भीतीपोटीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेस मान्यता दिली, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल यांनी बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमादरम्यान ही टिप्पणी केली. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला.
‘माझी गाडी (मिथिला विद्यापीठाच्या) प्रवेशद्वारासमोर थांबली होती. पण मी हार मानली नाही. मी बाहेर पडलो आणि पायी येथे पोहोचण्यासाठी एक वळणावळणाचा मार्ग निवडला’, असे राहुल म्हणाले. ते मिथिला विद्यापीठाच्या आंबेडकर सभागृहात विद्यार्थ्यांना संबोधित करीत होते. वर्षअखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘शिक्षा न्याय संवाद’ हा सार्वजनिक संवाद कार्यक्रम सुरू केला आहे.
केंद्र सरकारवर आरोप
केंद्र सरकार अंबानी, अदानी आणि त्यांच्यासारख्या लोकांच्या हिताचे काम करते. ही व्यवस्था पाच टक्के लोकसंख्येच्या हितासाठी काम करत आहे. दलित, ओबीसी आणि आदिवासींचेही ऐकत नाही; मग ते सरकार असो, कॉर्पोरेट जगत किंवा माध्यम समूह असो, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधींच्या उपस्थितीत जालन्यात मेळाव्याची तयारी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काँग्रेसला तीन खासदारांचे बळ असल्याने जातनिहाय जनगणनेच्या काँग्रेसच्या मागणीचे श्रेय पदरात पडावे म्हणून राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मे अखेरपर्यंत हा मेळावा घेण्याविषयी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर बोलणी झाली आहेत. खासदार कल्याण काळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. या कार्यक्रमास राहुल गांधी यांनी यावे, असेही प्रयत्न केले जात आहेत.