काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पुन्हा एका भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला आहे. ते आज (१५ सप्टेंबर) अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. “मी एकवेळ इतर विचारधारांची तडजोड करू शकतो. पण आरएसएस आणि भाजपाच्या विचारधारेशी मी कधीही तडजोड करू शकत नाही”, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपा आणि आरएसएसला सुनावलं आहे.

“ते (भाजपा) स्वतःला हिंदू पक्ष म्हणवतात आणि संपूर्ण देशातीलं लक्ष्मी आणि दुर्गांवर हल्ला करतात. हे जिथे जातात तिथे एकतर लक्ष्मीला मारतात किंवा दुर्गेला मारतात. ते फक्त हिंदू धर्माचा वापर करतात, धर्माची दलाली करतात. पण ते हिंदू नाहीत”, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे. यावेळी, खासदार राहुल गांधी यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या नव्या चिन्हाचं आणि नव्या ध्वजाचं अनावरण केलं आहे.

भाजप आणि RSS ‘ते’ बंधन तोडण्याच्या प्रयत्नात!

आपल्या यापूर्वीच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यात भाजपावर शाब्दिक हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले होते की, “भाजपाने जम्मू -काश्मीरला कमकुवत केलं आहे. तुमचं राज्यत्व तुमच्याकडून हिसकावून घेतलं आहे. पण जम्मू -काश्मीरला त्याचं राज्यत्व परत मिळायलाचं हवं. माझ्या हृदयात जम्मू -काश्मीरला विशेष स्थान आहे. पण मला वेदनाही होतात. जम्मू -काश्मीरमध्ये बंधुभाव आहे. पण भाजप आणि आरएसएस ते बंधन तोडण्याचं प्रयत्न करत आहेत.”