पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन न करण्याचा निर्णय तेलंगणा राष्ट्र समितीने घेतला आहे. या निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला मोठा झटका बसल्याचे चित्र आहे. एकीकडे रामविलास पासवान यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाला. मात्र, त्याचवेळी कॉंग्रेसच्या गोटात येण्याची दाट शक्यता असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीने आपला पक्ष स्वतंत्रपणे चालविण्याचे निश्चित केले आहे.
निवडणुकीपूर्वी तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी कॉंग्रेसने फेटाळून लावली. त्यामुळे आपल पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन न करण्याचा निर्णय तेलंगणा राष्ट्र समितीने घेतला. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, तर आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करू, असे आश्वासन मी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना दिले होते. मात्र, त्यावेळी संसदेमध्ये वेगळ्या तेलंगणाचे विधेयक मंजूर झाले नाही. त्यामुळे आता मी कॉंग्रेस पक्षाला त्यावेळी दिलेल्या आश्वासनाला बांधील नाही, असे चंद्रशेखर राव यांनी सोमवारी रात्री पक्षाची बैठक संपल्यावर पत्रकारांना सांगितले.