नवी दिल्ली : अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या मोहिमेवर सोमवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून निदर्शने करणारे काँग्रेस सदस्य चर्चेत सहभागी झाले नाहीत. मात्र, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शुक्ला यांच्या मोहिमेचे कौतुक केले. सर्व भारतीयांना त्यांच्या मोहिमेचा अभिमान आहे. ‘भारताच्या महत्त्वाकांक्षी मानवी अवकाशमोहिमेसाठी ही मोहीम एक महत्त्वाची प्रतीक ठरेल,’ असे ते म्हणाले.

थरूर म्हणाले, ‘शुक्ला यांच्या यशस्वी मोहिमेमुळे नव्या पिढीला विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश, गणित, अभियंता क्षेत्रांत करिअर करण्याची प्रेरणा मिळेल. या विषयावरील विशेष चर्चेत विरोधक सहभागी नाहीत. ‘सर्व भारतीयांना कमांडर शुक्ला यांच्या या मोहिमेचा अभिमान आहे,’ असे मी त्यामुळे म्हणतो.’

‘पक्षीय राजकारणाच्या चौकटीतून बाहेर यावे’

‘राष्ट्रीय स्वाभिमानाचे आणि यशाचे जे विषय असतात, त्या वेळी विरोधकांनी पक्षीय राजकारणाच्या चौकटीतून बाहेर यावे,’ अशी टीका संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी केली. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील प्रवासावर चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. शुक्ला यांच्या उपलब्धीवर चर्चेदरम्यान विरोधकांनी बिहारमधील ‘एसआयआर’च्या मुद्द्यावर सभागृहात जोरदार विरोध केला. त्यामुळे शुक्ला यांच्यावरील चर्चा कुठल्याही निर्णयाप्रत पोहोचली नाही.

‘भारताचे २०४० मध्ये चंद्रावर पाऊल’ ‘भारतीय अंतराळवीर २०४० मध्ये चंद्रावर पाऊल ठेवून विकसित भारताची नांदी करील,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी केले. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय स्थानकावरील प्रवासावर लोकसभेत चर्चा झाली. त्या वेळ ते बोलत होते. २०२० मध्ये खासगी क्षेत्राला अवकाश क्षेत्र खुले केल्यानंतर अवकाश क्षेत्रातील भारताची गुंतवणूक ८ अब्ज डॉलरपर्यंत गेली असून, पुढील दशकभरात ती ४५ अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असे ते म्हणाले. २०२६ मध्ये रोबो ‘व्योमित्र’ची मोहीम होईल, तर २०२७ मध्ये पहिले मानवासह अवकाश उड्डाण होईल, असे ते म्हणाले.