scorecardresearch

“सावरकर समझा क्या? नाम…”, राहुल गांधींचा कारमधला फोटो आणि काँग्रेसचं ‘ते’ ट्वीट व्हायरल!

राहुल गांधींच्या ‘त्या’ फोटोसह काँग्रेसनं केलेलं ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरलं असून त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

rahul gandhi
राहुल गांधी (संग्रहीत छायाचित्र)

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. भाजपाकडून राहुल गांधींनी लंडन दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानांवर परखड शब्दांत टीका करतानाच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेतही सलग पाच दिवस गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधींनी त्यांच्या विधानांबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणी भाजपाकडून केली जात असताना काँग्रेसकडून त्यांच्या भूमिकांचं समर्थन केलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा एक फोटो शेअर करत काँग्रेसनं केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होऊ लागलं आहे.

राहुल गांधी वादाच्या केंद्रस्थानी का?

राहुल गांधी नुकतेच त्यांच्या लंडन दौऱ्यावरून परत आले आहेत. मात्र, त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून सत्ताधारी भाजपाकडून रान उठवलं जात आहे. राहुल गांधींनी लंडनमध्ये भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं विधान केल्याचं सांगितलं जातं. त्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. राहुल गांधींनी संसदेचा अपमान केला असल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे.

राहुल गांधींच्या घरी पोलीस!

दरम्यान, आज राहुल गांधींच्या घरी चौकशीसाठीदिल्ली पोलीस दाखल झाल्यामुळे त्यावरून वाद निर्माण झाला होता. ३० जानेवारी रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये एका सभेत बोलताना राहुल गांधींनी लैंगिक शोषण झालेल्या महिलांविषयी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. ” या यात्रेदरम्यान अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या, त्या रडत होत्या, त्यापैकी काही महिलांनी मला सांगितलं की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. मी त्या महिलांना म्हणालो की, मी पोलिसांना याबद्दल सांगू का. ते या प्रकरणी कारवाई करतील. त्यावर त्या महिला मला म्हणाल्या की, राहुलजी ही गोष्ट आम्हाला फक्त तुम्हाला सांगायची होती. पोलिसांना याबद्दल काही सांगू नका. अन्यथा आम्हाला अधिक त्रास सहन करावं लागेल”, असं राहुल गांधी म्हणाले होते. याचप्रकरणी त्यांच्या चौकशीसाठी पोसिलांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

आता या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरलं आहे. या ट्वीटमध्ये काँग्रेसनं राहुल गांधींचा कारमध्ये बसलेला एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोबरोबर एका वाक्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करून ट्वीट करण्यात आलं आहे. यामध्ये “सावरकर समझा क्या? नाम राहुल गांधी है”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 18:39 IST